रखडलेल्या विकासकामांना येणार वेग

आचारसंहिता दोन दिवसांत होणार शिथील

पुणे – लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सोमवारी शिथील होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या शहरातील रखडलेल्या विकासकामांना वेग येणार असून प्रशासनाला अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अंदाजपत्रकातील सहा महिन्यांच्या कामाचा बॅकलॉग भरून काढावा लागणार आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (23 मे) जाहीर झाला असला तरी, शनिवार आणि रविवारी सलग शासकीय सुट्ट्या आल्याने निवडणूक आयोगाकडून याबाबत आदेश काढण्यात आला नाही. हा आदेश सोमवारी निघण्याची शक्‍यता महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शहरात 10 मार्चपासून लागू झाली. दरम्यान, त्यानंतर 1 एप्रिल 2019 पासून महापालिकेचे 2019-20चे अंदाजपत्रक लागू झाले. मात्र, अत्यावश्‍यक सेवा वगळता या अंदाजपत्रकाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी निर्णय घेण्याची प्रक्रिया आचारसंहितेमुळे थांबली होती. या शिवाय, महापालिकेच्या नदीसुधारणा (जायका) भामा- आसखेड प्रकल्प, रस्ते दुरूस्ती, नाले सफाईच्या निविदा, आरोग्य विभागाची औषध खरेदी, महापालिकेकडून अनुदान स्वरुपात दिल्या जाणाऱ्या मदत तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ या काळात बंद करण्यात आला होता. त्यामुळे आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला पालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना आचारसंहितेत अडकल्या होत्या. तसेच, या कालावधीत शहरासाठीच काहीच निर्णय घेता येत नसल्यानेही महापालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. मात्र, आता आचारसंहिता शिथील झाल्यानंतर हे निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आचारसंहिता शिथील झाल्यानंतर महापालिका प्रशासनास पुढील तीन महिन्यांत पाच महिन्यांचे कामकाज करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नवीन आर्थिक वर्षातील एप्रिल आणि मे महिन्यांत काहीच कामे झालेली नाहीत. तर सप्टेंबर महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हातात जून ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याचा कालावधीच असून या कालावधीत एप्रिल आणि मे महिन्यासह विधानसभेच्या आचारसंहीतेपूर्वी सप्टेंबर, ऑक्‍टोबर तसेच नोव्हेंबर महिन्याचे कामकाजही आताच मार्गी लावावे लागणार आहे.

पोट निवडणुकीने संभ्रम
लोकसभेची आचारसंहिता संपताच दुसऱ्या दिवशी शहरात लगेच महापालिकेच्या तीन प्रभागांच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू लागली आहे. ही आचारसंहिता केवळ या प्रभागांपुरती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रभागात कोणतेही नवीन काम सुरू होणार नाही, तसेच या प्रभागांबाबत कोणतीही घोषणा अथवा निर्णय घेता येणार नाही. मात्र, महापालिकेच्या मुख्यसभेत घेण्यात आलेला शहर पातळीवरील कोणताही निर्णय या भागालाही लागू होणार आहे. त्यामुळे तो निर्णय मतदारांसाठी एक प्रलोभनच ठरणार असल्याने या पोटनिवडणुकीने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.