रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या 500 जनुकांचा शोध

रक्तदाब आणि जनुके यांच्या संबंधित महत्त्वाचा शोध
लंडन – ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या एका मोठ्या जनुक अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. या संशोधकांनी रक्तदाबावर परिणाम करणाऱ्या 500 जनुकांचा शोध लागल्याचा दावा केला आहे. या संशोधनादरम्यान 10 लाख लोकांचा अभ्यास करण्यात आला होता. रक्तदाब आणि जनुकीय संबंध या विषयावर क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन अँड इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी या विषयी अभ्यास केला होता.

या अभ्यासात संशोधकांनी 10 लाख लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या जनुकीय माहितीची व रक्तदाबाची पडताळणी केली. नव्याने ओळखल्या गेलेल्या रक्तदाब जनुकांचा इतर एपीओईसारख्या जनुकांशी संबंध होता. एपीओई हे जनुक हृदयरोग आणि अल्झायमरशी संबंधित आहे. तसेच काही जनुके ऍड्रिनल ग्रंथी व मेदपेशींशी संबंधित असल्याचेही संशोधकांना यामध्ये दिसले. या जनुकीय संकेतांना ओळखता आल्यामुळे आजाराच्या गांभीर्यानुसार रुग्णांचे गट करता येतील असे या अभ्यासाच्या सहलेखिका आणि इम्पीरियल कॉलेज, लंडन येथील अध्यापिका पॉल इलियट यांनी सांगितले. या अभ्यासामुळे रक्तदाबावर उपचार करण्यासाठी नव्या पद्धतींचा शोधही लागण्याची शक्‍यता आहे. नेचर जेनेटिक्‍स या नियतकालिकामध्ये या संशोधनावर आधारित निबंध प्रसिद्ध झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्तदाब आणि जनुके यांच्या संबंधातील ही सर्वात मोठी प्रगती असल्याचे मत नॅशनल रिसर्च बार्टस बायोमेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक मार्क कॉलफिल्ड यांनी सांगितले. रक्तदाबावर परिणाम करणारे 1000 जनुकीय संकेत आता आपल्याला माहिती झाले आहेत. यामुळे आपले शरीर रक्तदाब कसे नियंत्रित करते आणि भविष्यात औषधनिर्मिती कशी करावी लागेल याची माहिती या शोधामुळे मिळेल, असे मत मार्क यांनी व्यक्त केले आहे.

जनुकांमुळेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, त्यांना डॉक्‍टर आता जीवनशैलीतील बदल, वजन कमी करणे, मद्यपान कमी करणे, व्यायाम करणे असे उपाय सुचवू शकतील. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक आणि हृदयरोगाचा त्रास होण्याची भीती असते, 2015 या एका वर्षामध्ये केवळ त्यामुळे जगभरात 80 लाख लोकांचे प्राण गेले, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)