कोल्हापूर : प्रख्यात योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे बुधवारी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. केरळ येथील अलपेटा येथील त्यांची कन्या कविता श्रेयांस यांच्याकडे राहण्यासाठी ते गेले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले असताना हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. सायंकाळी हवाई रुग्णवाहिकेने त्यांचे पार्थिव कोल्हापूरात आणण्यात येणार आहे.उद्या त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. गुंडे यांचे मूळ गाव कर्नाटकातील बोरगाव (ता. चिकोडी) हे आहे. व्यवसायासाठी ते कोल्हापूरात स्थायिक झाले. दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल या युवक शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.डॉ. गुंडे हे नामांकित अस्थिरोगतज्ज्ञ असले तरी त्यांची खरी ओळख योगगुरु अशीच होती. त्यांनी प्रदीर्घ काळ योगाचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य योग आणि प्राणायाम याच्याशी निगडित होते. त्यांची प्रेरणा घेउन अनेकांनी योगाचे धडे त्यांच्या शिबिरातून घेतले.
आतापर्र्यत त्यांचे 900 हून अधिक योगशिबिरे झाली असून 901 वे शिबिर पुढील महिन्यात कोल्हापूर मुक्कामी होणार होते.योगाच्या प्रसारासाठी तसेच प्रशिक्षणासाठी त्यांनी देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातही शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. योगक्षेत्रातील अपूर्व योगदानाबद्दल त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेने कोल्हापूर भूषण हा पुरस्कार देउन गौरविले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा