युवा पिढीसमोरील सर्वोत्तम दीपस्तंभ ‘महाभारत’

श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्ट ः गीता महाभारत संदेश कथा सोहळ्याच्या शुभारंभ
नगर – मानवी जीवनातील सगळ्या प्रकारच्या स्वभावाचा परिचय ‘महाभारत’ ग्रंथ करून देतो. घरात तेजस्वी बालकांनी जन्म घ्यावा, यासाठी गर्भसंस्कार म्हणून महाभारताचे श्रवण व्हावे. आजच्या युवापिढीसमोरील सर्वोत्तम दीपस्तंभ ‘महाभारत’ ग्रंथच आहे, असे प्रतिपादन पू.स्वामी गोविंददेव गिरीजी (पू.आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले.
श्रीरामकृष्ण सेवा ट्रस्ट आयोजित गीता महाभारत संदेश कथा सोहळ्याच्या शुभारंभी ते बोलत होते.ट्रृस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार व पुष्पा मणियार या दाम्पत्याच्या हस्ते महाभारत ग्रंथाची पूजा करून स्वामी गोविंददेवगिरीजींना सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर विराजमान असलेल्या ह.भ.प.मुकूंदकाका जाटदेवळेकर व महंत संगमनाथ महाराज यांनाही सन्मानित करण्यात आले.
सर्वश्री.बाळासाहेब गांधी, मोहनलाल मानधना, सुरेश चांडक, मगनभाई पटेल, सोमनाथ नजान, हर्षल शहा व हर्षा गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर व हभप गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी नजान, पुष्पा औटी व नगरकर यांनी केले.
स्वामी पुढे म्हणाले, आपल्या भारत देशात शतकानुशतके महाभारत घरात ठेवावे की नको. ते ऐकावे की न ऐकावे, याविषयी मतमतांतरे आहेत. हे आम समाजासह राष्ट्राचे दुर्दैवच. मी गेली अठरा वर्षे संपूर्ण भारत देशात महाभारताचे श्रवण करा, हे सांगत फिरतो आहे. मानवी जीवनाचा सखोल – व्यापक विचार जगाच्या पाठीवर केवळ भारतीय संस्कृतीने केला आहे. भरकटलेले विचार मानवी जीवनाचे उत्थान करू शकत नाहीत.आकांक्षामुळे माणूस पुढे-पुढे चालत रहातो. माणसाने सातत्याने उन्नत होण्याचा प्रयत्न करावा. भारतीय परंपरेत ‘रामकृष्णहरी’ या महामंत्राचा जाप व संकिर्तन केले जाते. ‘रामकृष्णहरी’ हा आपल्या जीवनाचा अभ्यासक्रम आहे. मानवी जीवन उत्तम होण्यासाठी ‘रामकृष्णहरी’ या अभ्यासक्रमाची आवश्‍यकता आहे.
उपजीविकेची विद्या व जीवनाची विद्या हे विद्येचे दोन प्रकार आहेत. विद्यालये व विद्यापीठांमधून शिकवल्या जात असलेल्या सर्व विद्या पोट कसे भरायचे? कसे कमवायचे? हे सांगतात. उत्तम चार्टर्ड अकौंटंटला वडीलांशी कसे वागावे? हे कळत नाही. उत्तम डॉक्‍टरला पत्नीशी कसे वागावे? हे कळत नाही. उत्तम वकिलास भावाशी कसे वागावे? हे कळत नाही. अनैतिक गर्भपात उच्चशिक्षितामधून अधिक प्रमाणात होतात. किडनी स्कॅण्डल करणारे शिकलेलेच असतात. मानवी जीवन सुखाकरिता आहे, हे समजून घेतले पाहिजे.
भारत देशात केवळ औपचारिक शिक्षणावर भर दिला नाही. दिवसभर काबाडकष्ट करणारे रात्री मठ-मंदिरांमधून कथा श्रवण करत राहिल्याने अनौपचारिक शिक्षणामधून ‘चरित्र’ व ‘चारित्र्य’ घडत राहिले.
महाभारत श्रवणाने जीवनात विजय प्राप्त होतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. महाभारत हे ‘केस स्टडीजचे’ संकलन आहे. मानवी जीवनाला विजयाकडे नेणारा हा अव्दितीय ग्रंथ आहे. महाभारतात सर्व शास्त्रे सामावलेली आहेत. महान भारताच्या निर्मितीसाठी ‘महाभारत’ उपयुक्त ठरणार आहे. महाभारत घरात वाचले जात नाही म्हणून घराघरात भांडणे होतात. महाभारत ही संघर्षाची कथा नव्हे तर आपल्या जीवनातील संघर्षाला मूठमाती कशी द्यावी? हे सांगणारी कथा आहे. जीवनातील मतभेद कुठे मिटवावेत? याचा संदेश महाभारतातून मिळतो, असे स्वामी गोविंददेवगिरीजी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)