युतीसाठी आढळराव पाटील यांचे योगदान

केंद्रीय मंत्री रामदास आठवले : शिरूरमध्ये पासपोर्ट कार्यालयाचे उद्‌घाटन

शिरूर- भाजप व शिवसेना युती होण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मोठा वाटा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मनवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न आढळराव – पाटील यांनी केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
शिरूर येथे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या शिरूर पासपोर्ट कार्यालयाचे उद्‌घाटन व राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत 2 हजार 663 लाभार्थी यांना एक कोटी पाच लाख रुपयांचे मोफत साहित्य वाटप व महामेळावा घेण्यात आला. याचे उद्‌घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, जयश्रीताई पलांडे, अरुण गिरे, पोस्ट मास्टर जनरल एस एफ एच रिजवी,
शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, पुणे ग्रामीण डाकचे अधीक्षक के. आर. कोरडे, सहायक अधीक्षक डी. के. वऱ्हाडी, योगेश वाळूंजकर, नेमीचंद फुलफगर, उपतालुका प्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख पोपट शेलार, महिला जिल्हा उपसंघटक विजया टेमगिरे, शहरप्रमुख संजय देशमुख, किरण देशमुख, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले, नगरसेविका अंजली थोरात, मच्छिंद्र गदादे, शैलजा दुर्गे, मयूर थोरात, अनघा पाठक उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, नवनवीन टेक्‍नॉलॉजीला प्राधान्य देण्याची भूमिका आहे. मुंबई, पुणे येथे पहिले अगोदर पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. परंतु खासदार आढळराव पाटील यांच्यामुळे शिरूर शहरामध्येच पासपोर्ट ऑफिस झाल्याने लोकांना परदेशात व्यवसाय, उद्योगासाठी जाण्यास नवीन संधी मिळाली आहे. पुलवामाबाबत आठवले म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक करायचे का युद्ध करायचे, याबाबत चर्चा सुरू आहे. भारताला त्रास देणाऱ्या पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्याचा विचार सरकारचा आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने देशात राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत शिरूर तालुक्‍यात 2 हजार 663 वृद्ध लोकांनी लाभ घेतला.
आढळराव पाटील म्हणाले की, पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त राष्ट्रीय वयोश्री योजनेचे लाभार्थी झाले आहे, हे कौतुकास्पद आहे. या योजनेला रामदास आठवले यांनी मदत केली आहे. शिरूर शहरात पासपोर्ट कार्यालयामुळे शिरूर मतदारसंघातील लोकांना याचा फायदा होणार आहे. बैलगाडा शर्यत बंद पाडण्याचे कपटी कारस्थान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले म्हणाले की, 368 वा पासपोर्ट कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आहे. या कार्यालयाकडून एक आठवड्यात पासपोर्ट मिळावा यासाठी प्रयत्न होणार आहेत. पासपोर्ट व्हेरीफीकेशन पंधरा दिवसावरुंन पाच दिवसांवर आले आहे.

  • दोस्ती तुटायची नाही
    शिवसेना – भाजप युतीमध्ये असून मला माझी सीट कधी मिळणार, अशी कोपरखळी आठवले यांनी मारली असता कार्यक्रमात जोरदार हशा पिकला. हा धागा पकडून त्यांनी राजकारणातील दोस्तीचा उलगडा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसबरोबर माझे चांगले संबंध आहेत. शरद पवार माझे चांगले मित्र आहेत. राजकारणात जरी मार्ग वेगवेगळे असले तरी दोस्ती कधी तोडायची नसते. कारण कधी कोणाबरोबर दोस्ती करण्याची वेळ येईल, हे सांगता येत नाही, अशी गुगली टाकताना त्यांनी पवार, छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हेही माझे मित्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे सर्वात चांगले मित्र असल्याची पुष्टी आठवले यांनी जोडली.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here