युतीच्या मैत्रीत ‘मिठाचा खडा’

विषय समित्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत ठिणगी


सत्तेत वाट्याचे आश्‍वासन; पण मागणीवर नकार

पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये हातात हात घालून फिरणारे युतीमधील भाजप आणि शिवसेना महापालिकेत मात्र एकत्र नांदणार नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे. महापालिकेच्या सत्तेत वाटा देण्याचे शिवसेनेला आश्‍वासन देण्यात आले खरे, मात्र प्रत्यक्ष देण्याची वेळ आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसले आहे. विषय समित्यांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतच ही ठिणगी पडली असून, आता अध्यक्षपदासाठी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानात शिवसेना कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या दोन विषय समित्याच्या अध्यक्षपदाची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती; मात्र ते देण्यास भाजपची तयारी नव्हती. त्यानंतर शिवसेनेने काहीच “रिस्पॉन्स’ न दिल्याने भाजपकडून चारही विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदससाठी अर्ज भरण्यात आले आहेत.

महापालिकेच्या विधि, क्रीडा, महिला बालकल्याण आणि शहर सुधारणा समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी अर्ज भरण्यात येणार होते. शिवसेनेकडून युती झाल्यानंतर महापालिकेच्या सत्तेमध्ये वाटा मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

उपमहापौरपद आणि विषय समित्यांचे अध्यक्षपदाची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र ती नाकारत भाजपने विधी समिती आणि क्रीडा समिती अध्यक्षपद पद देण्याची तयारी दर्शवली होती; मात्र महत्त्वाच्या समित्या शिवसेनेला मिळत नसल्यामुळे शिवसेनेकडून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद घेण्याला पूर्णपणे नकार दिला.

विषय समित्यांवर भाजप आणि शिवसेना यांचे एकमत होऊ न शकल्यामुळे भाजपने चारही विषय समित्यांसाठी अर्ज दाखल केले आहेत. येत्या चार मे रोजी यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महायुतीचे उमेदवार गिरीष बापट यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. मतदान प्रक्रिया संपली असून, अद्याप निकाल जाहिर होणे बाकी आहे. असे असताना महापालिकेतील सत्तेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा फुट पडली आहे.

भाजपने विधी आणि क्रीडा समिती देऊ असे सांगितले होते. मात्र, शिवसेनेला हे मान्य नव्हते. आम्हाला शहर सुधारणा आणि महिला बालकल्याण समिती हव्या होत्या. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपचा प्रस्ताव नाकारण्यात आला.
– संजय भोसले, गटनेते, शिवसेना, मनपा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.