#यादों की बारात: अनवट वाटेवरचा मि. अँड मिसेस अय्यर

अश्‍विनी धायगुडे-कोळेकर 
प्रत्येक प्रवास व्यक्‍तीला समृद्ध बनवत असतो. मग तो एखाद्या इप्सित ठिकाणी पोहोचण्याचा असो की आपल्या आयुष्याचा. या रस्त्यात, प्रवासात येणाऱ्या अडचणी, दुःख,आनंद हे सगळेच अनुभव समरसून घेणाऱ्यांना, प्रत्येक क्षण जगणाऱ्यांना हे आयुष्य भरभरून देत असतं.
आयुष्यरूपी प्रवासात अनेक वाटसरू प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपल्याला भेटतात. काहींशी आपले आयुष्यभरासाठी ऋणानुबंध जुळतात तर काही मात्र कायमसाठी धडा देऊन जातात. पण हीच मंडळी आपल्या या प्रवासाचे, अनुभवाचे भागीदार बनतात आणि पुन्हा आपल्याला नव्याने समृद्ध करतात.
आपला देश जिथे विविध जात, धर्म , पंथ असणारी माणसं एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. पण हीच माणसं प्रसंगी एकमेकांच्या जीववरही उठतात. जात, धर्म, पंथ यासाठी ही एकमेकांचं रक्‍त अगदी सहजगपणे सांडतात तेदेखील कोणताही खेद वा खंत न वाटता. जिवाभावाचे मित्र अचानक शत्रू बनतात. घासातला घास देणारी मंडळी एकमेकांचा जीव घेण्यास हत्यार उपसतात. प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेनेच पाहिले जाते. कारण प्रत्येकाला वाटतं त्याचीच जात उच्च, त्यांचाच धर्म श्रेष्ठ. या जातपात- धर्माचा पगडा इतका घट्ट विळखा घालतो कि यात माणुसकी गुदमरून मारून जाते. पण या जातीपातीच्या धर्माच्या नावाखाली सुरू असणारा गोंधळ काहींच्या गावीही नसतो. त्यांना या गोष्टींशी कसलंही सोयरसुतक नसते ते माणुसकी जाणतात आणि जगतातही तसेच.
असाच एक प्रवास त्याचा आणि तिचा. बाहेर परिस्थिती फारच चिघळलेली आहे. अशा नाजूक परिस्थितीमध्ये कोणीही बाहेर पडणं फार जिकिरीचं असत. पण ही दोघ आणि तीच बाळ या परिस्थितीचा सामना करीत असतात. दोघांनाही आपापलं घर गाठायचं आहे . या दोघांचाही धर्म वेगळा आहे.
स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवून घेणारे त्याची जात कळली तर त्याच्याही जीवावर उठतील म्हणून ती त्याला स्वतःचा नवरा सांगते आणि सुरू होतो एक प्रवास अनोळखी व्यक्‍तीसोबत.. पण समृद्ध करून जातो तीच आयुष्य.
या प्रवासात त्या दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा तर आता आपला जीव जाणार की काय असं तिला वाटायला लागत आणि त्याची मदत केल्याचा पश्‍चातापही होतो. रात्रीच्या वेळी मुक्‍काम करायची वेळ येते. परिस्थिती खूपच चिघळलेली असल्याने त्यांना कसबसे जंगलातील डाक बंगल्यामध्ये एक खोली मिळते. पण पुन्हा मोठा यक्षप्रश्न एकाच खोलीत एका अनोळखी आणि परधर्मीय व्यक्‍तीसोबत कसे राहायचे पण तो तिची ही अडचण ओळखतो आणि बाहेर पडतो. तिथला वॉचमन म्हणतो, नवीन नवीन लग्न आहे त्यामुळे भांडताय उद्या 25 वर्षांनी नाही होणार हे.
रात्र सरते कशीबशी. सकाळी उठून ही बघते तर याचा पत्ताच नाही. ही जाम घाबरते, वॉचमन हा सांगतो तो गेला. आता मात्र हीच अवसान गळून गेलंय. मला आणि या छोट्या बाळाला सोडून हा जाऊच कसा शकतो असा तिचा प्रश्न! डोळ्यात पाणी, नजर खिडकीतून बाहेर आणि तिला तो दिसतो. ती धावतच बाहेर जाते. आता चेहरा फुललाय. ती म्हणते, मला वाटलं तू गेलास आम्हाला सोडून, वॉचमनने तेच सांगितलं. तो म्हणतो, तुला विश्‍वास बसला. ती शांत हसते.
आता हळूहळू दोघांचे सूर जुळायला लागतात. ती त्याचा कॅमेरा हातात घेऊन पाहू लागते. तो एक फोटोग्राफर असतो. तो तिला फोकस कर असे सांगतो आणि तिचे व तिच्या बाळाचे काही फोटो काढतो. बाहेर अजूनही वातावरण तंग आहे. मिळेल त्या ठिकाणी गेलेले त्यांचे सहप्रवासी एकत्र येतात. त्यात काही तरुण तरुणी. हे जोडपं नवीन वाटतं आणि गप्पा सुरू होतात. त्यांचं प्रेमप्रकरण, लग्न, मधुचंद्राबद्दल.
तो विषय टाळणार, सगळे त्याला कसा लाजला बघ म्हणत चिडवतात आणि मग तो सुरू होतो. डोंगरावरच्या ट्री हाऊसमध्ये कधीच न झालेल्या त्यांच्या मधुचंद्राबद्दल रंगवून सांगतो. ती आश्‍चर्याने त्याचाकडे पाहते. मग ती ही त्याच्यासोबत आपलं म्हणणं जोडत जाते.
त्यांच्या कधीच न झालेल्या मधुचंद्राबद्दल दोघेही भरभरून बोलतात. त्या रात्री पुन्हा दोघे डाकबंगल्यात थांबतात. आज तो व्हरांड्यात थंडीत तसाच झोपलाय. ती त्याला जाऊन पांघरूण घालते. अचानक वॉचमन येतो आणि दंगेखोर लोक तिकडे आलेत म्हणून आत जायला सांगतो. तो त्या लोकांचे फोटो घ्यायला बाहेर जातो पण ती जाऊ देत नाही आणि अचानक ती त्याच्या कॅमेऱ्यामधून पाहते. दंगेखोरांनी एकाचा मुडदा पडलाय. तिला ते सहनच होत नाही. ती चक्क ओकायला सुरुवात करते. तो तिला शांत करतो ती झोपते. सकाळी उठून बघते तर तो तसाच बसून पलंगावर डोकं टेकून झोपलाय.
आता बाहेरचं वातावरण बरचंस निवळलंय. ते रेल्वेमध्ये निघतात. त्याने पाणी प्यायलेल्या बाटलीमधूनच ती ही पाणी पिते. आणि हळूच म्हणते, आपला तो जंगलातला मधुचंद्र छान होता न ! आणि दोघेही मोकळं हसतात. त्यांच्या नजरेत ‘ हा असा सोहळा आपल्या आयुष्यात का नाही झाला ‘ याची बारीकशी खंत दिसते.
कलकत्ता स्टेशन येत. तिचा नवरा तिची वाट बघत थांबलेला असतो. तो आवाज देतो मिनू, मीनाक्षी. ती येते. मागून हा छोट्या संथामनला घेईन उतरतो. ती नवऱ्याला त्याची ओळख करून देते. हे जहांगीर चौधरी. यांनी खूप मदत केली. माझी आणि हे माझे पती मणी अय्यर.
आता जहांगीर तिचा निरोप घेतोय. मिनूचा नवरा तिकडे सासऱ्याशी फोनवर बोलतोय. जहांगीर मिनूला निरोप देऊन निघालाय, मिनू त्याला पाठमोरा पाहतेय. अचानक जहांगीर पुन्हा मागे फिरतो आणि तिचे व संथामनचे फोटोज असलेला रोल तिला देतो आणि निरोप घेतो गुडबाय!
ती म्हणते गुडबाय मिस्टर अय्यर! मिनूच्या डोळ्यात आभाळ दाटून आलंय आणि जहांगीर ही आवंढा गिळतोय.
एक प्रवास, दोन अनोळखी व्यक्ती आणि आयुष्य समृद्ध करणारा अनुभव. हा सिनेमा म्हणजे मिस्टर ऍन्ड मिसेस अय्यर. कोकणा सेन शर्मा आणि राहुल बोस या अत्यंत गुणी कलाकारांच्या अभिनयाने सजलेला आणि अपर्णा सेन यांच्या सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाचा हा सिनेमा.
उत्तम दिग्दर्शक तोच जो प्रेक्षकांना हळवं करतो आणि अपर्णा सेन यांनी ते काम उत्तमरीत्या पार पाडलं आहे. हा सिनेमा नवरा-बायकोच्या नात्यावर कोणतेही भाष्य करीत नाही किंवा धर्मांधतेवरही बोट ठेवत नाही. पण या दोन्ही विषयांना अलगद हात घालतो.
प्रत्येक व्यक्‍तीचं त्याच्या जोडीदाराबद्दलच त्या मोरपंखी दिवसांबद्दलच अस एक स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. पण इथे मात्र मिनू आणि जहांगीर आपल्या त्या कधीच नसणाऱ्या दिवसांबद्दल बोलून ते दिवस जगण्याचा प्रयत्न करतात. दोघांच्याही नजरेत ‘कदाचित हे खरं असतं किंवा हे खरं असायला हवं होतं’ अशी खंत दिसते. हा प्रवास जसा त्या दोघांसाठी अगदी तसाच प्रेक्षकांसाठीही अविस्मरणीयच! कुठेही दृश्‍य स्वरूपात शृंगार न चितरता केवळ शब्दांनी तो उभा करण्याची किमया अपर्णा सेन यांनी साधली आहे. नेहमीच ऑफबीट सिनेमे देणारे कोंकणा आणि राहुल यांची केमिस्ट्री अप्रतिम. असे हे मिस्टर एन्ड मिसेस अय्यर काही काळासाठी का होईना प्रत्येकाला हळवं करूनच जातात हेच या सिनेमाचे यश.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)