याड लागल… बाई याड लागल…

कवठे : शेतामध्ये कोळपणी सोडून मोबाईलमध्ये गुंतलेले तरुण शेतकरी व त्यांना कंटाळून बसलेला बैल. (छाया: करुणा पोळ, कवठे)

मोबाईल फोबियाने शहरीसह ग्रामीण भागपण हवालदिल
करुणा पोळ
कवठे, दि. 27 – काही वर्षापूर्वी शाळकरी मुले ही मैदानी खेळांमध्ये दंग असायची आणि त्यातच त्यांना रुची होती. जसजसा काळ बदलत गेला तसतसे शहरी व ग्रामीण जीवनावर सोशल मीडियाचे आक्रमण होवू लागले आणि लोकांच्या सर्वच दिनचर्येची पुरी वाट लागली. टी.व्ही.चे युग आले अन्‌ सकाळ संध्याकाळ बातम्या व ठराविक वेळेत लोक टी. व्ही. पाहू लागले. ग्रामीण भागात दर रविवारी सकाळी 9:30 वाजता रामायण, महाभारत या सिरीयल सुरु झाल्यावर सर्वच व्यवहार ठप्प होत होते. या सिरीयल संपल्यावर नित्याचे व्यवहार सुरु होत होते. लोकांना यातून ज्ञान व इतिहासाबद्दल माहिती नसलेली माहिती मिळत गेली हा याचा फायदा.
पण काळ बदलत गेला आणि दिवसातून दोन ते तीन वेळा दिसणाऱ्या बातम्या व कार्यक्रम या दिवसभर पुन्हा पुन्हा दाखवल्या जाऊ लागल्या व त्यांची क्रेझ कमी होवू लागली व जो तो आपल्या मोकळ्या वेळात त्या पाहू लागल्या. याचबरोबर हळूच मोबाईलने लोकांच्या मनामनात घर निर्माण केले आणि सणासुदीला संदेश पाठविण्यासाठी वेगवेगळ्या संदेशांची चढाओढ सुरु झाली. काही काळाने अमर्याद बोलणे स्वस्त झाल्याने संदेश टाईप करण्यापेक्षा बोलण्यावर लोक भर देवू लागले. हे कमी म्हणून की काय मोबाईल स्मार्ट झाला अन्‌ त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुक अवतरले. हळूहळू बोलणे व संदेश करणे कमी झाले व लोक फेसबुकवरून एकमेकांशी संदेश साधू लागले व यातच मोबाईलचा एस.एम.एस हा एकेकाळी महत्वाचा असणारा तारा निखळला. फेसबुक सोबत व्हॉटसऍप हे मागच्या दाराने मोबाईलमध्ये आले. कधी मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले ते कळलेच नाही. याचबरोबर फेसबुकवरून व्हिडिओ कॉल आले. अमर्याद डेटा व अमर्याद कॉल या सुविधा आल्याने प्रत्येकजण व्हिडिओ कॉलकरून बोलता बोलता एकमेकांचे दर्शन घेवू लागला. यातच फेसबुकची व व्हॉटसअपची ग्रुप कॉलिंग सुविधा आल्याने सर्वजन या सुविधेचा वापर करू लागला. एकेकाळी फक्त कॉल घेण्यासाठी व करण्यासाठी हा मोबाईलचा महत्वाचा असलेला उपयोग बंद होवून कॉल स्वस्त तर डेटा महाग होवू लागला. या बदलांना जेवढे प्रेमाने सगळ्यांनी स्वीकारले तेवढ्याच वेगाने या बदलांनी माणसाला माणसातून संपविले. माणूस माणूसपण हरवून ऑनलाईन झाला. एकमेकांना समोरासमोर भेटल्यावर एकमेकांच्याकडे न पाहता मोबाईलमध्ये पाहत रस्त्याने फिरू लागला. याचे असंख्य तोटे होऊ लागले. सोशल मीडियावरूनच लोक समाजकार्य करू लागले किंवा त्याबद्दल संदेश देवू लागलेत पण प्रत्यक्षात एखादी सामाजिक कृती करण्यासाठी ऑनलाईन निमंत्रण आले तर त्या ठिकाणीसुद्धा तो गैरहजर राहू लागला. त्यामुळे शिवाजी महाराज जन्मावेत पण दुसऱ्याच्या घरात, मी फक्त मोबाईल मोबाईल खेळेन अशीच गत सद्यस्थितीत सगळीकडे पहावयास मिळत आहेत. या सोशल मीडियाच्या आहारी बहुसंख्य तरुण पिढी एवढ्या प्रमाणात गुरफटली आहे की आपल्या आजूबाजूच्या लोकांशी ते कित्येक दिवस न बोलता फक्त या सोशल मीडियावर तासन्‌तास डोके खुपसून बसत आहेत. त्यामुळे माणूस करिअर, व्यायाम, जबाबदाऱ्या या गोष्टीपासून अलिप्त होत स्वत:लाच संपवत चालला आहे. जसे तोटे आहेत तसे फायदेही प्रचंड प्रमाणात आहेत. याचा वापर करून स्वत:ची प्रगतीसुद्धा लोक करू लागलेत. पण या सोशल मीडियाचा उपयोग कोणी व कसा करावा याला मर्यादा नसल्याने यातून प्रगती करण्यापेक्षा अधोगतीच जास्त प्रमाणात होत असल्याचे चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे.
धावत्या वेळेमागे जीवनात धावताना कित्येक काळ चालू काम सोडून सारखाच सोशल मीडियाचा ध्यास सध्या प्रत्येकजण घेत आहे. याच रोगाला मोबाईल फोबिया असे म्हणतात. व्हॉटसऍप वर व्हायरल होत असलेल्या मेसेज पैकी एक मेसेज असा पण आहे. व्हॉटसऍप म्हणजे कोंबडीचे खुराडे असून जसे कोंबडीने अंडे दिले का नाही हे पाहण्यासाठी जसे आपण वारंवार खुराडे उघडून बघतो तसे दर एक दोन मिनिटांनी आपण व्हॉटसऍप बघत असतो. यातून पुन्हा एकदा बाहेर यायची गरज भासत असून हे चक्रव्यूह भेदणारा अभिमन्यू पुन्हा जन्माला यायची गरज आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)