यवत परिसरात रस्ते विभागाची कारवाई

पुणे-सोलापूर महामार्गावरील शंभरहून अधिक अतिक्रमणे काढली

यवत- यवत आणि परिसरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमण हटवित रस्ते विभागाने गुरुवारी (दि. 4) कारवाई केली. या कारवाईमुळे होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास काही अंशी मदत होणार आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम 2013-14 मध्ये झाले. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला 30 मीटर जागा रस्ते विभागाने अधिग्रहित केली आहे; परंतु महामार्गालगतचे छोटे-मोठे व्यावसायिक नियमांचे पालन न करता बहुतेक व्यावसायिक अतिक्रमण करीत आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यातून छोटे-मोठे अपघात होत होते. रस्ते विभागाने अनेक वेळा व्यावसायिकांना अतिक्रमण हटवण्याबाबत सांगितले होते; परंतु येथील व्यावसायिक ऐकत नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यावर नोटिसा बजावून केलेले अतिक्रमण हटविण्याच्या सूचना केल्या गेल्या. नोटिसा देऊनही अतिक्रमणे न हटविल्याने रस्ते विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 4) यवत, कासुर्डी, भांडगाव परिसरातील जवळपास शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये राज्य सुरक्षा दलाचे जवानही सहभागी झाले होते. या हटविलेल्या अतिक्रमाणांमुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने मोकळा श्वास घेतला.

दोन दिवसांपूर्वीही चौफुला परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले होते. यवत येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूला रस्ते विभागाने बॅरिकेट्‌स लावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यात एसटी बस महामार्गावर न थांबता सुसाट वेगाने जात होत्या. एसटी बसेस सर्व्हिस रस्त्याने याव्यात यासाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने केली होती. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असल्याने एसटी बस आता सर्व्हिस रस्त्यांनी येत आहेत. आता अतिक्रमणे हटविल्याने होणारी वाहतूक कोंडी काहीअंशी सुटण्यास मदत होणार आहे. पुढील काळातही अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.