यंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव

– अंजली खमितकर

समजूतदार पुणेकरांना श्रेय : प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लाखो नागरिकांच्या सहभागाने नुकताच पुणे आणि परिसरात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. याचे श्रेय पोलीस, महापालिका यांनाही द्यावे लागेल. या यंत्रणांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. याचे काही अंशी श्रेय पुणेकर नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही तर, काही अपवाद वगळता दाखवलेल्या समजूतदारपणाला द्यावे लागेल.

यंदाच्या उत्सवावर डीजे बंदीची छाया होती. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये ढोल-ताशांप्रमाणेच डीजे वाजविला जातो आणि तरुणाईमध्ये तो प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या डीजेंच्या आवाजाने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि ध्वनिप्रदूषणाचे गंभीर परिणाम दिसू लागले होते. अखेर राज्य सरकारने संपूर्ण डीजेंवरच बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. हायकोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे मंडळांमध्ये नाराजी निर्माण झाली. अनेकांनी मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत गोंधळ होण्याचीही शक्‍यता होती. मात्र, पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि एखाद दोन घटना वगळता याची अंमलबजावणी झाली. त्यामुळे ध्वनिप्रदूषण घटल्याचेही आढळून आले आहे. त्याबरोबरच गेल्या काही वर्षांत मिरवणुकीत गुलालाचा वापर कमी झाला असून, त्यामुळे हवेच्या प्रदूषणातही घट झाल्याचे आढळून आले आहे.

आता डीजे वाजविल्याप्रकरणी 105 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर नियमाप्रमाणे कारवाई होईलच. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, हे यातील फलित म्हणावे लागेल.

दुसरा वर्षानुवर्षांचा मुद्दा म्हणजे मिरवणूक लवकर संपविण्याचा. गेल्या काही काळात अनंत चतुर्दशी संपून पौर्णिमा उजाडली, तरी मिरवणुका सुरूच असतात. त्यामुळे शहराच्या मध्यभागात दुसऱ्या दिवशीही वाहतुकीची कोंडी होते आणि या भागातील शाळा-कार्यालयांमधील कामकाज होऊ शकत नाही. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली, मात्र नेहेमीच्या वेळेपेक्षा तीन तास ही मिरवणूक लवकर संपली.

सुरुवात चांगली…
सकाळचे मानाचे गणपती आणि रात्रीचे मंडई-दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांच्या मिरवणुकांमध्ये सर्वाधिक वेळ घेतात आणि त्यामुळे संपूर्ण मिरवणुकीस विलंब होतो, असा आक्षेप घेण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर यंदा या मंडळांनी लवकर मिरवणुका संपविण्याचे जाहीर केले होते. मानाच्या गणपतीच्या मंडळांनी अपवाद वगळता मिरवणुका लवकर पूर्ण केल्या. त्याप्रमाणेच मंडई-दगडूशेठ हलवाई आणि अन्य काही प्रमुख मंडळांनी रात्री लवकरच मिरवणुकीला प्रारंभ केला. यंदा विक्रमी वेळ वाचला नसला, तरी ही सुरुवात चांगली झाली, असे मानून पुढील वर्षी हा वेळ आणखी कमी करण्यासाठी सर्वच घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी समजूतदारपणा दाखविला, तर हे अशक्‍य नाही. त्यासाठी गणपतीबाप्पानेच सुबुद्धी द्यावी, हीच प्रार्थना!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)