म्हसवड पालिकेत स्वच्छतेचा बट्ट्याबोळ

दीड वर्षापासून स्वच्छता नुसता अभियानाचा देखावा :

म्हसवड, दि. 30 (प्रतिनिधी) – म्हसवड पालिकेतील गेले दिड वर्ष स्वच्छता अभियानाचा नुसता देखावा केला जात असून प्रत्यक्षात शहरात स्वच्छतेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे. सद्या शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून साथीच्या आजारांच्या रूग्णाची संख्या वाढू लागली आहे. पालिकेतील कामांची बिले काढण्यावरून सुरू असणाऱ्या रुसव्या-फुगव्यांमुळे गेल्या दीड वर्षातही एकही विकासकाम झाले नसल्याचे दिसत आहे.
देशात स्वच्छतेचे सर्वेक्षण सुरू असताना यात म्हसवड पालिकेनेही सहभाग घेतला होता. अभियानाचे फ्लेक्‍सही शहरात लावले होते. मात्र पालिकेने स्वच्छतेचे रितसर टेंडरच दिले नसल्यामुळे स्वच्छतेचा निधी शिल्लक असून गेली दीड वर्ष जो ठेकेदार स्वच्छतेचे काम करत होता. त्या ठेकेदाराचे बिलच पालिकेने दिले नसल्यामुळे त्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगारच दिले नव्हते. यामुळे कर्मचाऱ्यांनी ऐन सर्वेक्षण सुरू असतानाच संप केला होता.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे रोग डोके वर काढतात. त्यामुळे आजारपण वाढण्याची शक्‍यता असते. शहरात ठिकठिकाणी खाजगी बांधकामे सुरू आहेत. त्या बांधकामांचे साहित्य महिनोमहिना पालिकेच्या गटाराशेजारी पडले आहे. यामुळे गटारी तुंबून डास वाढत आहेत. याकडे पालिका प्रशासनाचे व पदाधिकाऱ्यांचे लक्षच नसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
यामुळे चिकनगुनिया, डेंगीसारखे आजार पसरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पदाधिकाऱ्यांना डिजिटल केबीन
गेली दोन महिने शहरातील गटारी स्वच्छ केल्या नसुन कचरा गाडीही वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी महिला करत आहेत. पालिकेकडे स्वच्छतेचा निधी शिल्लक असताना दिड वर्षे कामे झाली नाहीत. पदाधिकाऱ्यांच्या केबिन डिजीटल बनवल्या आहेत. मात्र, शहराच्या स्वच्छतेकडे कोणाचेच लक्ष नाही. मागील वर्षीही शहराला साथीच्या रोगांनी विळखा घातला होता. यावर्षीही तीच परिस्थिती आणायची आहे का? असा सवाल संतप्त नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)