मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा वाहनचाेर गजाआड

  • चिंचवड पोलिसांची कामगिरी : पाच दुचाकी हस्तगत

पिंपरी – मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दीड लाख रुपये किंमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचे तीन गुन्हे उघड झाले असून इतर दोन वाहनांच्या मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

सुरज शिवाजी भालेराव (वय 20, रा. डांगे चौक. मूळ रा. मंचर, ता. आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चिंचवड परिसरात ऍन्टी गुंडा कारवाई करत असताना पोलिसांना बिर्ला हॉस्पिटलकडून वाल्हेकरवाडीच्या दिशेने नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून एकजण संशयितरित्या जाताना आढळला. पोलिसांनी त्याला थांबवून दुचाकीची माहिती घेतली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. एमएच-14-एफयू-9520 ही दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहे.

पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणाकडे कसून चौकशी केली असता त्याने पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दीड लाख रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. त्यातील तीन दुचाकींबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. एमएच-16-बीएन-9264 आणि एमएच-12-जेएच-3849 या दोन दुचाकींच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे, निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव, कर्मचारी जगताप, पाटील, आखाडे, माने, डोके, राठोड, रूद्राक्षे यांच्या पथकाने केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.