मोहिते पाटील व हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीने सुळेंच्या चिंतेत वाढ

बावड्यात गुप्त भेट बैठकीचे रहस्य मात्र गुलदस्त्यातच

बावडा- खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आज सकाळी बावडा (ता. इंदापूर) येथे अचानक भेट घेतली. या पडद्याआड झालेल्या बैठकीतील चर्चा मात्र गुलदस्त्यातच असल्याने बैठकी विषयी तालुक्‍यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. ही राष्ट्रवादीकरिता अर्थातच सुप्रिया सुळे यांच्याकरिता चिंतेचा विषय ठरणारी आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु, मी कॉंग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असून मी पक्ष सोडण्याचा विचार केलेला नाही आणि करणारही नाही, असे स्वतः पाटील यांनी सांगितल्याने त्या चर्चेवर पडदा पडला. परंतु, भाजप मध्ये प्रवेश केलेले खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज अचानक बावडा येथील रत्नाई निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. ही चर्चा दोघांतच झाली. यामुळे माजी मंत्री पाटील हे लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात, याविषयीचे औत्सुक्‍य वाढले आहे.

देशात व राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य पक्षांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाआघाडी आहे. परंतु, इंदापूर तालुक्‍यात मात्र आजही वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. तालुक्‍यामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणूनच आजही वावरताना दिसतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभेला माजी मंत्री पाटील यांना नेहमीच मदतीची गळ घातली जाते. परंतु, विधानसभेच्या वेळी मात्र दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहतात. त्यामुळे पाटील यांनी जरी त्यांच्या कार्यकर्त्यांना आघाडी धर्म पाळण्याच्या सूचना केलेल्या असल्या तरी आघाडी धर्म पाळण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नाही.
त्यामुळेच खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गुप्त भेटीला वेगळेच महत्त्व आले आहे. या बैठकीत नेमके काय घडले कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे मात्र गुलदस्त्यातच असल्याने वेगवेगळ्याच राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

  • मोहिते व पाटीलांचे जिव्हाळ्याचे संबंध…
    अकलूजचे मोहिते पाटील घराणे व बावड्याचे पाटील घराण्याचे कित्येक दशकांपासून अगदी जिव्हाळ्याचे संबंध असून ते एकमेकांच्या सुख दुःखात नेहमीच सहभागी होत असतात. राजकारणातील अनेक निर्णय या मातब्बरांनी एकत्रितरित्या घेतल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळेच बंद दाराआडच्या बैठकीतून काय निष्पन्न होणार? हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईलच.
  • राजकारणात काही तरी शिजतंय…
    बावड्यात बंद दरवाजात झालेल्या बैठकीला मोहिते पाटीलांच्या सुत्रांकडून दुजोरा देण्यात आला आहे. तर, पाटलांकडून मात्र ही बैठक केवळ औपचारीक असल्याचे सांगण्यात आले. परंतु, नेमकी चर्चा कोणत्या मुद्यांवर, विषयांवर झाली. याबाबत माहिती देण्यास मात्र दोघांकडूनही नकार देण्यात आला. यावरूनच राजकारणात काही तरी मोठे शिजत असल्याचा अंदाज लावला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.