मोहिते आणि पाटलांची सल्लामसलत

बावड्यातील बैठकीनंतर तर्क-वितर्कांना उधाण

बावडा- लोकसभा बारामती मतदार संघात शंका-कुशंका बळावत असतानाच खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून ही भेट सुप्रिया सुळे यांच्याकरिता चिंतेच विषय मानली जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी डावलल्याने विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपशी घरोबा केला. मोहिते पाटील यांना भाजप मध्ये जाण्याचा सल्ला हर्षवर्धन पाटील यांनीच दिल्याचे बोलले जात होते. त्यावेळी पाटील हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा होती. परंतु, त्यानंतरच्या राजकीय घडमोडींमुळे ही वावटंळ थांबली होती. परंतु, आज पुन्हा विजयसिंह मोहिते पाटील यांनी बावडा येथील पाटील यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या बैठकीत केवळ या दोघा नेत्यां व्यतिरीक्त कोणीही नव्हते. एक तासभर चालेल्या या बैठकीत राजकीय विषयांवर सल्लासमलत झाली असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेची रणधुमाळी वेगाने सुरू झालेली असताना खासदार मोहिते यांनी स्वत: हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणे, ही राजकीयदृष्ट्या मोठी घडमोड मानली जात आहे. मोहिते यांना भाजपमध्ये जाण्याविषयी सल्ला देणारे हर्षवर्धन पाटील यांनीही आता कॉंग्रेसमधून भाजपमध्ये यावे, याकरिता तर मोहिते पाटील प्रयत्न करीत नसतील ना? अशी चर्चा सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.