नवी दिल्ली – पंतप्रधान मोदी यांनी आपला विश्वासघात केला अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्याच्या कारकिर्दीत देशाची अर्थव्यवस्था पुर्ण अपयशी ठरली आहे अशा शब्दांत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की मोदी हे पंतप्रधानांपेक्षा प्रचार मंत्रीच अधिक वाटतात. दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू, शंभर स्मार्ट सिटी निर्माण करू, विदेशातील 80 लाख कोटी रूपयांचा काळापैसा परत आणू ही आश्वासने त्यांनी दिली होती पण ती साफ फसली आहेत असा आरोपही त्यांनी केला.
मोदींच्या कार्यशैलीवर जोरदार टीका करताना ते म्हणाले की मोदी हे सत्तेचे भुकेलेले आहेत. ते स्वताच्याच नादात असतात आणि स्वतालाच प्रोजेक्ट करण्यात ते व्यस्त असतात. त्यांच्या या स्वताला प्रोजक्ट करण्याच्या प्रयत्नांतही धादांत खोटेपणा ठासून भरलेला असतो. देशातल्या प्रत्येक प्रश्नाचे आपल्याकडेच उत्तर आहे अशा भ्रमात ते आहेत त्यामुळे देशातील समस्येबाबत कोणाशीही चर्चा करीत नाहीत असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. मोदी हे व्यक्तीगत स्वरूपात भ्रष्टाचारी आहेत असा आरोपही त्यांनी केला. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, फसलेली अर्थव्यवस्था या देशापुढील गंभीर समस्या आहेत असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींची वागणूक घमेंडखोरीची आहे असा दावा त्यांनी केला. निवडणुकीनंतर आपण स्वता पंतप्रधान होणार काय असा प्रश्न मुलाखतकर्त्याने राहुल गांधी यांना विचारला असता ते म्हणाले की निवडणुकीत जनता मालक असते आणि त्यांना कोण हवे आहे ते ती जनताच ठरवत असते. अशा स्थितीत मी जर मी स्वताच पंतप्रधान होणार असे नमूद केले तर मीही घमेंडखोरीच करीत आहे असे लोक म्हणतील पण मला मोदींसारखे ऍरोगंट व्हायचे नाही अशी टिपण्णी त्यांनी केली.
विशिष्ठ प्रचारासाठी माध्यमांवर दहशत
पाकिस्तानवर करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकचा भाजपला मोठा राजकीय लाभ होत असल्याचे चित्र असून त्यामुळे सध्या भाजप हा पक्ष कॉंग्रेस पेक्षा पुढे आहे असे चित्र माध्यमांमध्ये निर्माण झाले आहे त्याविषयी प्रतिक्रीया विचारली असता राहुल गांधी म्हणाले की माध्यमांवर दबाव आणून असा प्रचार केला जात आहे. माध्यमांना सीबीआय, ईडीचा वापर करून धमकावले जात आहे. त्यांच्यावर दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे मोदींच्या ऑफीस मधून जशी सुचना येईल तशीच लाईन पकडून त्यांना बातम्या द्याव्या लागत आहेत असा आरोप त्यांनी केला. अशाही परिस्थितीत काही पत्रकार हा दबाव झुगारून काम करीत आहेत त्यांचे राहुल गांधी यांनी यावेळी कौतुक केले.