मोदींच्या “डर्टी पिक्‍चर’मध्ये शिवसेना कोण ?

दुटप्पी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर विरोधकांचे टीकास्त्र

मुंबई – नाणार प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर विरिधकांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्‍चर सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे? मोदी व्हीलन असतील तर उद्धव ठाकरेंना साइड व्हीलनच म्हणावे लागेल, अशी जळजळीत टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या विरोधाचा पंचनामा करताना, नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे त्यांच्यात आणि भाजपात झालेल्या एका डीलचा भाग असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. उद्धव ठाकरे नाणार नाही देणार असं म्हणतात. मग नाणारच्या तहात काय घेणार ? ते ही त्यांनी सांगून टाकावे. मावळे विकले जात नाहीत, हे त्यांचे म्हणणे खरे आहे, पण स्वयंघोषित सेनापती विकले जातात, त्याचे काय असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असे म्हणता, मग मंत्रिमंडळात तुमचे मंत्री तरी कशाला राहतात?असा सवाल करताना, सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱ्यांची आता “डबल सेन्चुरी’ होत आल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या थापा मारून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले असले तरी तशी कोणतीही प्रक्रिया अजून सुरूही झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)