मॉब लींचिंगच्या वाढत्या घटनांना सरकार जबाबदार – शशी थरूर

पुणे – देशातील मॉब लींचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज जाहिरपणे संताप व्यक्त केला आहे. ते आज पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

त्यावेळी ते म्हणाले की गेल्या ६ वर्षांपासून आपण देशात काय पाहतोय ? पुण्यात 2014 मध्ये मोहसिन शेख या तरूणाची हत्या करण्यात आली होती, त्या घटनेनंतर या मॉब लींचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. त्यानंतर मोहम्मद अखलकलाही मारण्यात आले, त्याच्याकडे बीफ होत असा आरोप करण्यात आला होता, मात्र त्यानंतर त्याच्याकडे बीफ नव्हतच, अशी माहिती समोर आली. जर त्याच्याकडे बीफ असत तरी त्याला मारण्याचा अधिकार या लोकांना कुणी दिला?

त्यानंतर ते म्हणाले की पहलू खान यांच्याकडे गायीला घेऊन जाण्याचे लायसेन्स होते, मात्र तरीही जमावाने त्यांना ठार केले. मात्र एका निवडणुकीच्या विजयाने या लोकांना एवढी ताकद मिळाली की ते काहीही करू शकतात आणि कुणालाही ठार मारू शकतात.

ते पुढे असेही म्हणाले की हाच आपला भारत आहे का ? आणि ही हिंदू धर्माची शिकवण आहे का ? मी हिंदू आहे मात्र अशा प्रकारचा हिंदू नाही. लोकांना जय श्री राम म्हणण्यावरून मारले जाते, आणि असे करणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे, आणि हा भगवान श्रीराम यांचाही अपमान आहे, कारण त्यांच्या नावाचा वापर करून लोकांना मारले जात आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे, आणि मॉब लींचिंग विरोधात संताप व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की आता भारत हा असा देश झाला आहे की तिथे सहिष्णुतेला काही जागा राहिलेली नाही. भारतात राजकीय ध्रुवीकरण झाले आहे आणि याला सत्ताधारी पक्ष आणि त्यांची ही कृत्ये जबाबदार असल्याची आगपाखड त्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.