#मेन स्टोरी: का बुडाले केरळ? (भाग-१)

प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

डॉ. माधव गाडगीळ समितीने 2011 मध्ये दिलेला इशारा खरा ठरल्याचे केरळमधील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या हाहाकारातून दिसत आहे. अतिवृष्टी नैसर्गिक होती, पण नुकसान हे मानवी हस्तक्षेपामुळे अतिप्रमाणात झाले. तिथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. याचे कारण जंगलांचा केलेला विनाश. त्यातूनच भूस्खलन झाले आणि चिखलनिर्मिती झाली. केरळसारखी स्थिती गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातही भविष्यात उद्‌भवू शकते. त्यामुळे केरळच्या प्रकरणातून राज्यकर्ते, शासकीय अधिकाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे. निसर्ग, पर्यावरण, जंगले अबाधित राखण्याचे प्रयत्न केले पाहिजे.

केरळमध्ये झालेल्या ऐतिहासिक पर्जन्यवृष्टीमुळे या राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. केरळमध्ये आलेली शतकातील सर्वांत मोठी आपत्ती म्हणून याकडे पाहिले जात आहे. हा पर्जन्यकहर समजून घेण्यासाठी आणि त्याची कारणमिमांसा करण्यापूर्वी थोडी पार्श्‍वभूमी पाहणे गरजेचे आहे. पश्‍चिम किनारपट्टी आणि दख्खनचे पठार याच्यांमध्ये पश्‍चिम घाट म्हणजे पर्वतरांग आहे. त्याची लांबी सुमारे 1600 किलोमीटर आहे आणि रुंदी 48 ते 210 किलोमीटर अशी वेगवेगळी आहे. पश्‍चिम घाटाचे एकूण क्षेत्रफळ 1 लाख 30 हजार चौरस किलोमीटर आहे. भारतामध्ये एकूण जमिनीपैकी केवळ 5 टक्‍के जमिनीवर पश्‍चिम घाट पसरलेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्‍चिम घाटामध्ये गुजरातचा थोडा भाग येतो. याखेरीज महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि थोडा तमिळनाडूचा भाग आणि केरळ या राज्यात या घाटाची व्याप्ती आहे. पश्‍चिम घाटात सहा राज्यांतील 142 तालुके आणि जवळपास 44 जिल्हे समाविष्ट होतात. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पश्‍चिम घाटाची भौगोलिक परिस्थितीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात उंच पर्वत, डोंगर, दऱ्या आहेत. त्यामुळे तिथे जागतिक स्तरावरील जैवविविधता आहे.

किंबहुना, पश्‍चिम घाट हा जागतिक स्तरावरील जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. जैवविविधतेने समृद्धता हे याचे वैशिष्ट आहे. पश्‍चिम घाटाची निर्मिती ही 3 ते 5 कोटी वर्षांपूर्वी झालेली आहे. हा एक ज्वालामुखीय पर्वत आहे. पश्‍चिम घाट अत्यंत कणखर पर्वतशृखंला असून तिथे बेसाल्ट खडक आहे. हिमालयात जोरदार पाऊस झाला की भूस्लखन होतं तेवढं प्रमाण पश्‍चिम घाटात दिसून येत नाही कारण तो कणखर भूप्रदेश आहे.

पश्‍चिम घाटात सुमारे 120 नद्यांचे उगम आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वच नद्यांवर मानवाने तब्बल 240 धरणे बांधली आहेत. या सर्व धरणांवर पाण्यापासून ऊर्जानिर्मितीचे प्रकल्पही उभारण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा की दक्षिण भारतातील आपली शेती, उद्योग, कारखानदारी ही संपूर्णपणे पश्‍चिम घाटावर अवलंबून आहे. त्यामुळेच आमच्यासारख्या पर्यावरणवाद्यांच्या मते, पश्‍चिम घाट हा दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा आहे. या भागातील जंगलामध्ये जागतिक स्तरावरील जैवविविधता आहे.

एकूण भारतात जेवढी जमीन आहे त्यापैकी 5 टक्‍के जमिनीवर पश्‍चिम घाट पसरलेला आहे. देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पश्‍चिम घाटामध्ये 65 टक्के जमिनीवर जंगल होते ते घटून आता केवळ 40 टक्‍क्‍यांहून कमी झाले आहे. गोदावरी, कृष्णा, कावेरी यासारख्या 120 नद्या उगम पावतात. शिवाय या पश्‍चिम घाटात असंख्य खनिजे आहेत. इथे जवळपास 65 टक्के प्रदेशात मानवी वस्ती आहे आणि 50 दशलक्ष लोक वास्तव्यास आहेत. या घाटात 41 प्रकारचे आदिवासी लोक राहातात. ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज पश्‍चिम घाटात जे 35 ते 40 टक्के जंगल शिल्लक आहे त्यातील 15 टक्के जंगल संरक्षित आहे. याचा सुस्पष्ट अर्थ असा की स्वातंत्र्यानंतर आपण पश्‍चिम घाटाची काळजी घेतली नाही. केवळ तेथील जंगलांचा विनाश केला आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाचा परिणाम म्हणूनच केरळातील हा महाप्रलय आहे, असे म्हटल्यास ते गैर ठरणार नाही.

#मेन स्टोरी: का बुडाले केरळ? (भाग-१)

#मेन स्टोरी: का बुडाले केरळ? (भाग-२)

#मेन स्टोरी: का बुडाले केरळ? (भाग-३)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)