मेट्रो, पीएमपी, कॅबसाठी असणार एकच तिकिट

पीएमआरडीएकडून “इंटिग्रेटेड तिकीटींग सिस्टीम’

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो मार्गावर “इंटिग्रेटेड तिकीटींग सिस्टीम’ ही यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना मेट्रो, कॅब आणि पीएमपी बसमधून एकाच तिकिटावर प्रवास करणे शक्‍य होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग 23 किलोमीटर लांबीचा आहे. याविषयी माहिती देताना प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले, सिंगापूर आणि हैद्राबाद येथे अशा प्रकारे “इंटिग्रेटेड तिकिटींग सिस्टिम’ राबविण्यात आली आहे. मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाला कॅबची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर, काही ठिकाणी पीएमपीएमएलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शुल्क आकारून आठ दिवसांपासून ते एक वर्षांपर्यंतचे मेट्रो कार्ड प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तुम्ही जेवढा प्रवास कराल, तेवढे पैसे या कार्डमधून कमी होणार आहेत. तसेच, त्यामध्ये पैसे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून प्रवाशांना सहजरीत्या प्रवास करणे आणि इच्छितस्थळी पोहोचणे शक्‍य होणार आहे. अशा प्रकारची सिस्टिम सिंगापूरमध्ये मेट्रो स्टेशनच्या परिसरात राबविण्यात आली आहे. या दोन्हीचा अभ्यास करून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो मार्गावर ही सिस्टिम राबविण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)