मेट्रोचे डबे असतील “लाइट वेट’, ऊर्जेची बचत करणारे; वाचा अधिक माहिती

डब्यांच्या प्रतिकृतीचे टिटागढ-फिरेमा कंपनीत कोलकात्यात अनावरण

पुणे – वनाझ ते रामवाडी आणि पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रो मार्गांचे सुमारे 48 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर ट्रेनच्या कोचेसचे बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे. शनिवारी या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण टीटागढ-फिरेमा या कंपनीमध्ये झाले.

 

 

मेट्रोचे व्हायडक्ट, स्टेशन, डेपो आणि भूमिगत मार्गांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कोचेसचे कंत्राट टिटागढ-फिरेमा या कंपनीला दिले असून, कोलकाता येथे बांधणी सुरू आहे. यावेळी महामेट्रोचे चेअरमन आणि शहरी विकास मंत्रालय सचिव दुर्गाशंकर मिश्रा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक सुनील माथुर आदी उपस्थित होते.

 

 

टिटागढ-फिरेमा ही कंपनी 3 डब्यांचे 34 ट्रेन संच पुरविणार आहे. कंपनीने डब्यांच्या बांधणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा फॅक्टरीमध्ये उभारली आहे. महामेट्रोने कोचच्या निर्मितीवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक नेमला आहे. आगामी मे अखेरीस कंपनीत याची चाचणी सुरू होईल. मेट्रोचे डबे हे ऍल्युमिनियमचे असतील. वजनाने ते देशातील इतर मेट्रोच्या डब्यांपेक्षा हलके असतील. यामुळे ऊर्जेची मोठी बचत होणार असल्याचे यावेळी दीक्षित म्हणाले.

 

 

अशी आहे रचना

देशात सध्या मेट्रो डब्यांचा ऐक्सल लोड सर्वसाधारणपणे 16.4 टन असतो. परंतु, पुणे मेट्रोच्या डब्यांचा ऐक्सल लोड 15.4 टन असणार आहे. यामुळे मेट्रो चालवण्यासाठी लागणाऱ्या डिझेलमध्ये 2 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त एका डब्यात 48 लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. 3 कोच लांबीच्या एका ट्रेनमध्ये साधारण 850 प्रवासी प्रवास करू शकतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.