– महापालिकेतील अनागोंदी कारभार पुन्हा समोर
– पालिका रेकॉर्डवर कार्यरत असल्याची अद्याप नोंद
पुणे : चार महिन्यांपूर्वी मृत झालेल्या सेवकाला चक्क महापालिकेच्या पोट निवडणुकीसाठी ड्युटी लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रकांत रामचंद्र रसाळ असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मात्र, या प्रकारामुळे महापालिकेतील अनागोंदी कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला असून कर्मचारी मृत झाल्यानंतरही त्यांची निवडणूक कामासाठी निवड झालीच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेकडून सध्या प्रभाग क्रमांक 1 आणि समाविष्ट 11 गावांमधील प्रभाग 42 साठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी निर्णय अधिकाऱ्यांनी प्रभाग 42 “ब’च्या कार्यालयीन कामासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे 3 क्लार्क तसेच एका शिपायाची मागणी केली होती. त्यानुसार, सामान्य प्रशासन विभागाने 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात रसाळ यांचे नाव आहे. रसाळ हे महापालिकेच्या नगरसचिव विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांचे चार महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले आहे.
त्यानंतर त्यांच्या पदावर अनुकंपा तत्त्वांतर्गत त्यांच्या नातेवाईकांकडून अर्जही करण्यात आलेला आहे. असे असतानाही, कर्मचारी मृत झाल्यानंतरही तो नगरसचिव विभागात कार्यरत असल्याची नोंद पालिकेच्या रेकॉर्डवर आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड नाही का आणि असेल तर ते अपडेट का केले जात नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, याबाबत नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, रसाळ यांचे निधन झाले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
सामान्य प्रशासन विभागाकडे निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी माहिती मागविण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी प्रभाग 42 च्या कामकाजासाठी कर्मचारी नियुक्तीची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक विभागाकडे याबाबत काही माहिती नाही, दिलेल्या माहितीवरूनच ही ऑर्डर काढण्यात आली आहे.या ऑर्डरनुसारच त्यांना 8 जून रोजी प्रशिक्षणास हजर राहण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे.
– विजय दहिभाते, उपायुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी