…मृत्युनंतरही संपेनात दुर्देवाचे फेरे

दिघी  – ज्यांनी रोजगार द्यायचा त्यांनीच केलेल्या निष्काळजीपणामुळे जीव गमावून बसलेल्या एका तरुणाचे दुर्दैव मृत्यूनंतरही संपेना. मृत्यू आणि अत्यंसंस्कार होऊन एक महिना झाल्यानंतरही अजूनही त्याच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धायकरवस्ती डुडुळगाव येथे 21 जून रोजी झालेल्या अपघातात प्राण गमावलेल्या 29 वर्षांच्या कामगाराचे पूर्ण नाव आणि पत्ता कुणालाही माहीत नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. अजूनही पोलीस विविध माध्यमातून भगवान गायकवाड या मृत्यू झालेल्या कामगाराच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.

आपल्याकडे काम करत असलेल्या कामगाराचे संपूर्ण नाव, पत्ता घेण्याइतपत तस्दी देखील जे ठेकेदार आणि व्यावसायिक घेत नसतील ते कामगाराच्या सुरक्षेची आणि भवितव्याची काय काळजी घेत असतील, असा प्रश्‍न येथे उपस्थित होत आहे. 21 जून रोजी धायकरवस्ती डुडुळगाव येथील रिगल रेसिडन्सी या बांधकाम साईटवर अपघात झाला होता. या अपघातात भगवान गायकवाड (वय 29) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भगवान गायकवाड एवढीच काय ती माहिती येथील ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांना त्याच्याबद्दल आहे. नाव असलेल्या एक अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिगल रेसिडन्सी आरसीसी बांधकामासाठी लावलेली लोखंडी क्रेन मालवाहू लिफ्टचे लोखंडी टॉवर काढण्यासाठी गायकवाड लिफ्टमधून सहाव्या मजल्यावर जात असताना अचानक मालवाहू लिफ्टचे वायर रोप तुटून मालवाहू लिफ्टसह तो खाली पडला. जबर जखमी झाला असल्याने त्यास वायसीएम हॉस्पिटल येथे आणण्यात आले. परंतु डॉक्‍टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघातात एकूण तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यात भगवान गायकवाड देखील होता. परंतु भगवान गायकवाड याची पूर्ण माहिती नसल्याने अद्यापही त्याच्या नातेवाईकांचा शोध घेणे सुरू आहे. पोलिसांनी काही दिवस त्याच्या नातेवाईकांची वाट पाहिली सर्वप्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याच्या मृतदेहावर सरकारी दाहिनीमध्ये अत्यंसंस्कार केले असल्याचे दिघी पोलिसांचे म्हणणे आहे.

फिरत आला म्हणून कामावर घेतला…
कामगार कामावर ठेवण्यावर प्रत्येक व्यावसायिक, उद्योजक आणि ठेकेदारांची ही जबाबदारी असते की त्यांनी आपल्या कामगाराविषयी संपूर्ण माहिती घेऊन संबंधित विभागास कळवावी. बांधकाम कामगारांसाठी सरकारने कित्येक कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. या योजनांचा लाभ मिळवून देणे हे देखील व्यावसायिकांचे कर्तव्य असते. परंतु या ठिकाणी ठेकेदार आणि व्यावसायिक यांनी कामगारांसोबत फक्‍त काम करुन घेण्याइतकाच संबंध ठेवला असल्याचे दिसून येत आहे. ठेकेदार आणि व्यावसायिकांनी पोलिसांनी देखील या कामगाराविषयी भगवान गायकवाड एवढ्या नावाव्यतिरिक्‍त कोणतीही माहिती दिली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड फिरत फिरत आले म्हणून त्यांना कामावर घेतले, अशी उडवा-उडवीची उत्तरे पोलिसांना देत आहेत.

निष्काळजीपणाची पराकाष्ठा
बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांनी या प्रकरणी निष्काळजीपणाची पराकाष्ठा केली असल्याचे दिसून येत आहे. या कामगाराविषयी कोणतीही माहिती देण्यास असमर्थता दर्शवणारा ठेकेदार आणि व्यावसायिक सांगत आहेत की तो फिरत फिरत येथे आला, काम मागितले म्हणून त्याला कामावर घेतले. याचाच अर्थ की, तो कुशल कामगार आहे की नाही याबाबत ठेकेदारास कोणतीही माहिती नव्हती. सुरक्षिततेच्या उपाययोजनाविषयी कामगाराला ज्ञान आहे की नाही याची ही माहिती ठेकेदाराला नव्हती तरी देखील त्याचा जीव धोक्‍यात येईल अशा प्रकारचे काम त्याला देण्यात आले.

ओळख शोधण्याची जबाबदारी
एखादा अनोळखी मृतदेह सापडावा आणि त्याच्या नातेवाईकांना शोधण्यासाठी जसे प्रयत्न करावे लागतात तसेच प्रयत्न येथे दुर्घटनेत प्राण गमावलेल्या कामगाराच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना करावे लागत आहेत. नाव आणि काम माहीत असलेल्या व्यक्‍तिची मृत्यूनंतर अनोळखी मयत अशी ओळख निर्माण झाली असून त्याचे वर्णन प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध करुन त्याच्या नातेवाईकांना शोधण्याची वेळ पोलिसांवर व्यावसायिक आणि ठेकेदारांनी आणली आहे. मयत भगवान गायकवाड याची उंची पाच फूट चार इंच असून, रंग निमगोरा, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे, कपाळ मध्यम, मिशी बारीक असे वर्णन पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)