मृतांच्या वारसांना पाच लाख रु.

पुणे – आंबेगाव बुद्रुक येथील दुर्घटनास्थळाची कामगार राज्यमंत्री संजय भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. एनडीआरएफ आणि प्रशासन यांच्या वतीने बचाव कार्य पूर्ण करण्यात आले आहे. दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यमंत्री भेगडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कोंढवा तसेच आंबेगाव बुद्रुक येथील घटनेचा आढावा घेतला. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर, कामगार उपायुक्‍त विकास पनवेलकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते. राज्यमंत्री भेगडे यांनी भारती हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक
पुणे शहर आणि परिसरात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी बुधवारी (दि.3) सकाळी साडे दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली असल्याची माहिती भेगडे यांनी दिली. यास जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आयुक्‍त तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.