पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी खरिपाची चिंता
वाघापूर – मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडेच गेले, नक्षत्राचे वाहन असलेल्या उंदराने काहीच कमाल केली नाही. आता शनिवार (दि. 22) पासून आर्द्रा नक्षत्र सुरु होत आहे. या नक्षत्राचे हत्ती हे वाहन असून आता हत्ती काय कमाल करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण हे नक्षत्र जर असेच वायाला गेले तर संपूर्ण खरीप हंगाम वायाला जाण्याची भीती आहे. याबाबत तालुका कृषी विभागाकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
यावर्षीचा खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी सर्वत्र भरपूर पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु, हा अंदाज चुकीचा ठरत आहे. दि. 8 जूनला यावर्षीचे पहिले मृग नक्षत्र सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत काही भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. हा पाऊस कायम राहील, अशी आशा असताना पावसाने दडी मारली आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पुरंदर तालुक्याकडे जवळपास गेली तीन ते चार वर्षे पावसाने पाठ फिरवली आहे. मागील वर्षे ही दुष्काळातच गेले. गावागावांतील पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. पिके नसल्याने जनावरांसाठीच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. यावर्षी दि. 8 जूनला मृग नक्षत्र सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुरंदर तालुक्याच्या काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, पावसाने दडी मारली. खरिपासाठी उशिरा पाऊस पडूनही उपयोग नाही. तसेच पहिल्याच हंगामाचे पीक उशिरा आल्यास पुढील रब्बी हंगामावरही त्याचा मोठा परिणाम होत असतो. शेतकरी कर्ज काढून पीक घेण्यासाठी आतुर झाला असताना पाऊसच नसल्याने आर्थिक गणित पूर्ण कोलडणार आहे.
बियाणे व्यापाऱ्यांनाही चिंता….
खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले वाटाणा त्याच प्रमाणे भूईमुग, बाजरी, इतर कडधान्ये त्याच प्रमाणे पालेभाज्या यांची बियाणे मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. बियाणांचा बाजारभावही दरवर्षीपेक्षा यंदा जास्त आहे, अशाही स्थितीत वेळेत पाऊस झाला नाही तर अशा बियाणांना वापराअभावी भुंगा लागण्याचीही भीती असते. यामुळे कृषी सेवा केंद्र चालविणारे व्यापारीही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.