मूलभूत समस्यां सोडवण्यास प्राधान्य द्यावे

हवेली तालुका वार्तापत्र

हवेली तालुक्‍यातील अनेक गावांत लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पिण्याचे पाणी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, विजेची समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अनेक गावांत पिण्याच्या पाण्याच्या योजना जुन्या झाल्या असून नवीन योजना राबवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा विस्तार होणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आणि त्याचा वापर काटकसरीने आणि योग्य पद्धतीने होण्यासाठी नागरिकांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने मीटरद्वारे पाणी देण्याची पद्धत गावोगावी राबवण्यात येण्याची गरज आहे. राज्यात नावलौकिकास पात्र झालेल्या शुद्ध पेयजल योजना सध्या ज्या गावांमध्ये राबवल्या गेल्या होत्या. त्या गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे, ही दाहक वास्तवता आहे. गावठाण हद्दीमध्ये ग्रामपंचायत निधीमधून अथवा इतर निधीमधून सांडपाण्याच्या व्यवस्थापन करण्याच्या हेतूने ग्रामपंचायतीने उपाययोजना केल्या पाहिजेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन ज्या गावांमध्ये करण्यात आले आहे. त्या गावांमध्ये आरोग्याचे प्रश्‍न सुटले आहेत. मात्र, काही ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने वादाचे प्रसंग आणि आरोग्याचे प्रश्‍न त्यांनी डोके वर काढले आहे.

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ओला व सुका कचरा वेगळा करण्याची पद्धत आणि कचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामपंचायतीने प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या गावांची लोकसंख्या जास्त आहेत, त्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापनाच्याबाबतीत अजूनही यश येत नसल्याने या समस्या शहरीकरणाचा प्रभाव असलेल्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोर्चा काढावे लागत आहेत.

गावाबाहेर तसेच शासनाच्या मालकी जमिनीवर कचऱ्याचे नियोजन करताना ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या परवानग्या घेऊन ही कामे होणे गरजेचे आहे. शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी आवश्‍यक असणारी वीज सध्या नागरिकांना पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होत नसल्याने शेती बरोबर इतर व्यवसायांमधील प्रगती मंदावली आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा एक भाग म्हणून नागरिकांनी कर भरणा करावा, यासाठी देखील नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.