मुळशीत भू-माफियांचा सुळसुळाट

जमीन घोटाळ्यात शेतकऱ्यांना सव्वाकोटींचा गंडा : पाच महिन्यांपासून न्यायाची प्रतीक्षा

बावधन – मुळशी तालुक्‍यात महसूल यंत्रणेच्या वरदहस्तामुळे नसलेल्या जमिनीची विक्री करून सर्वसामान्य जनतेला सव्वाकोटी रुपयांचा गंडा बसलेला आहे. त्यामुळे मुळशीत फसवणूक लुटण्याचे प्रकार करणाऱ्या भू-माफियांचा सुळसुळाट झाला आहे.

मुळशी महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्य तसेच संगनमताने श्रीशैल गाडेकर आणि अमित गाडेकर यांनी भुकूम (ता.मुळशी) येथील गट नं.124 मधील सर्व प्लॉट धारकांची फसवणूक केलेली आहे. 7/12 उताऱ्यावर 146 आर जागा असताना गाडेकर यांनी 2012 व 2013 मध्ये तब्बल 175.3 आर जागेची विक्री केली आहे. म्हणजे 29.3 आर हा अस्तित्वात नसलेल्या अतिरिक्‍त जागेची विक्री केलेली आहे. ज्यांनी ही जागा घेतली आहे, त्यांनी सहायक निबंधकांकडे खरेदीखत करुन शासनाला सुमारे 50 लाख रुपये महसूल भरला आहे. त्यामुळे शासनाला महसूल भरुनही हे बेकायदेशीर दस्त झाले आहेत. भुगावच्या तलाठी कार्यालयात उशिरा व बेकायदेशीरपणे झालेल्या खरेदीखतांची नोंद ही त्याआधीच्या कायदेशीर खरेदीखताच्या अगोदर केली आहे. जोपर्यंत सर्व बेकायदेशीर व्यवहार पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एकाही खरेदीधारकाचे नाव तलाठ्याने सात-बारा उतारावर लावले नाही. तलाठी आणि गाडेकर यांनी जाणून बुजून सातबारा उतारावर नोंद घालण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लावला.

परिणामी, अनेक जणांकडे कायदेशीर खरेदीखत असून ती जमीन खरेदीदारांना अद्यापही मिळाली नाही. याउलट बेकायदेशीर खरेदीखतधारकांच्या ताब्यात या जागा असून त्यावरून सतत वादविवाद, रस्त्याची अडवणूक, गुंडांचा त्रास, धमकावणे, दहशत अशा छळवणुकीला कायदेशीर खरेदीखत करणाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. कायदेशीरपणे जागा खरेदीला 6 वर्षे होऊन देखील त्यांना त्या जागेचा उपभोग त्यांना घेता येत नाही. या प्रकरणात एकूण 35 जागाधारकांची सरळ सरळ फसवणूक झाली असून 2014 ते 2018 या कालावधीत मुळशी तहसीलदार, पौड पोलीस निरीक्षक यांच्यासह प्रांतधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही दखल घेतली गेली नाही.

त्यामुळे फसवणूक झालेल्या पीडितांनी दि. 21 ऑगस्ट 2018ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निवेदन दिले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी लॅंड डेव्हलपर श्रीशैल गाडेकर व अमित गाडेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दि. 22 ऑगस्ट 2018 रोजी डॉ. अभिजित मोरे यांच्या फिर्यादीवरून पौड पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी श्रीशैल गाडेकर व अमित गाडेकर यांच्यावर पैसे घेऊन जागा न देता परस्पर इतर व्यक्‍तींना विकल्याचा 1 कोटी 16 लाख रुपयांच्या फसवणुकीचा व 35 जागा धारकांच्या रस्त्याच्या अडवणुकीचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवला आहे मात्र, गेल्या पाच महिने झाले तरी कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक वैतागले असून ते न्याय मागत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना विसर?
भूमाफियांना संरक्षण देणाऱ्या महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करावी या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोनदा आंदोलन करण्यात आले. दि. 27 ऑगस्ट 2018 रोजी अधिकाऱ्यांची चौकशी करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मान्य केले होते;परंतु गेल्या पाच महिन्यांत याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली, तर बुधवार (दि. 13) पासून उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख, डॉ. अभिजित मोरे, मंदार देहेरकर, जयंत गंधे यांनी जागाधारकांच्या वतीने दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)