मुळशीत बारावीच्या परीक्षेस शांततेत सुरुवात

पिरंगुट केंद्रावर 1049 विद्यार्थी देताहेत परीक्षा

पिरंगुट- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस मुळशीत सुरळीत व शांततेत सुरू झाले. पिरंगुट केंद्रावर एकूण 1049 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत, अशी माहिती पिरंगुट विद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्र संचालक एस. बी. लाडके यांनी दिली.
मुळशी तालुक्‍यात बारावीच्या परीक्षेसाठी पिरंगुट हे एकमेव केंद्र आहे. या केंद्रावर तालुक्‍यातील पिरंगुट, भुगाव, पौड, उरावडे, रिहे, सैनिकी शाळा आणि चाणक्‍य शाळेतील तसेच खासगी विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले आहे. एकूण विद्यार्थी संख्या मोठी असल्याने पिरंगुट केंद्रावर कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर कासारआंबोली येथे उपकेंद्र आहे. त्याठिकाणी शास्त्र शाखेचे विद्यार्थी परीक्षा देत आहे. आज परीक्षेच्या दिवशी पिरंगुट केंद्रावर सरपंच मंदा पवळे, उपसरपंच दिलीप पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, भिमाजी गोळे, दिलीप गोळे, महादेव गोळे, उद्योजक सचिन पवळे, अभिजीत पवळे, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष विशाल पवळे, पत्रकार तेजस जोगावडे, प्राचार्य एस. बी. लाडके, पर्यवेक्षिका डी. एस. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उपसरपंच दिलीप पवळे म्हणाले, परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता व्यवस्थित पेपर लिहावा. गेल्या वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या आधारे पेपर लिहून चांगले गुण मिळवावेत.
दरम्यान, परीक्षा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.