मुरुम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

पाच महिन्यांपासून पगारच नाही : कर मिळत नसल्याने पगार थकले

सोमेश्‍वरनगर- मुरुम (ता. बारामती) ग्रामपंचायतीकडे पैसे शिल्लक नसल्याने नोव्हेंबर ते मार्च अशा पाच महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. लाखो रुपयांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकित असल्याने आणि त्याशिवाय ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचा कर मिळत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थकले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मुरुम ग्रामपंचायतीकडे एकूण सात कर्मचारी आहेत. यामधील दोन लिपीक, दोन शिपाई आणि तीन पाणीपुरवठा कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा जवळपास पावणेदोन लाख रुपये पगार थकला आहे.

ग्रामपंचायत प्रशासन वसुलीसाठी कोणतीही मोहीम राबवत नसल्याने लाखो रुपयांची थकबाकी ग्रामपंचायतीला येणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांचे काम नसतानाही घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामस्थांकडे पाठविले जाते व वसुल झाल्यावरच पगार होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. खरतर ग्रामपंचायतीच्या सर्वच पदाधिकारी, ग्रामसेवक, प्रतिष्ठित ग्रामस्थ नागरीक यांनी वसुलीसाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. मात्र, त्यापद्धतीत कामकाज होत नाही. अशा कारणानेच सणासुदीला आणि प्रचंड उन्हाळ्यात कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या वर्षीही या कर्मचाऱ्यांच्या पगाराची अशीच परीस्थिती झाली होती. यानंतर ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांना पगार दिले. दिवाळीनंतर कर्मचाऱ्यांचा पगार थकला असल्याने आम्ही संसार कसा करायचा असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. अगोदरच तुटपुंज्या पगारावर ग्रामपंचायतीचे कर्मचारी काम करीत असतात. ग्रामस्थांना एखाद्यावेळी पाणी आले नाही, तर रात्री अपरात्री कामगारांना फोनद्वारे सूचना केल्या जात आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कोणीही पुढे येत नाही. अशा परिस्थिती दाद कोणाकडे मागायची असा प्रश्‍न कामगारांना पडला आहे.

  • या आठवड्यात पगार करणार
    गुढी पाडव्या सारख्या मराठी नववर्षारंभी कामगारांना पगाराची अपेक्षा असताना प्रशासनाने या आठवड्यात पगार करणार असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.