मुरलेले लोणचे

छोट्या नातीला-स्वराला घेऊन मी माझ्या आईकडे म्हणजे तिच्या पणजीकडे गेले होते. आई आता थोडी थकलेली पण तरीही सतेज, उत्साही, आनंदी आणि सुगरण.

जेवायला बसल्यावर नातीला म्हणजे माझ्या लेकीला आवडते म्हणून तिने लोणच्याची बरणी काढली. चिनी मातीच्या बरणीत, दादरा बांधून ठेवलेली ती मोठी बरणी माझी नात पाहात होती. आश्‍चर्य आणि कुतुहल तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आजीने तो रुमाल का बांधलाय बरणीला? असा प्रश्‍न तिला नक्‍कीच पडला होता. मी तिला म्हटले पणजी आजी लोणचे खूप छान घालते आणि त्याचे खूप प्रकारही करते. तो रुमाल आहे ना तो ते लोणचे खराब होऊ नये, बरणीत काही मुंगी वगैरे जाऊ नये म्हणून बांधला आहे. पानातील लोणच्याचा खार खाताना तिला तिखट लागला. पण तिने नकळत छान आवाज केला. तो तिला आवडल्याचा दाखला होता. मग पणजीने तिच्यासाठी गोड लोणचे काढले. मग तर स्वारी जाम खूष झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पणजी म्हणाली, आज माझ्या पणतीने माझ्या हातचे लोणचे खाल्ले आणि तिला ते आवडले हे खरंच माझे भाग्य आहे. बरं का गं मुलींनो- संसारसुद्धा असाच मुरला की छान लागतो बरं का- कधी कधी बिघडतोदेखील पण निगुतीने केला तर नक्कीच टिकतो. त्यासाठी थोडी मेहनत, थोडा संयम, थोडा त्याग याचा मसाला वापरावा लागतो. राग, लोभ, मीपणा, अभिमान या साऱ्यांचं याला वावडंच असतं आणि वर थोडी प्रेमाची फोडणी घातली की जमून जातं सारं.

आईचं साधंसं तत्त्वज्ञान पण त्यात खरंच किती अर्थ भरला होता. संसार हा खरंच लोणच्यासारखा आंबट, गोड आहे. दोन भिन्न व्यक्‍ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची मते, त्यांच्या सवयी, त्यांचे विचार हे वेगळे असू शकतात. शिवाय दोन भिन्न घरातील रूढी, परंपरा, रितीरिवाज यांचीही त्यांच्या मनात एक विशिष्ट जागा असते. ते सारे जुने सारे विसरून, नवीन बदलाला सामोरे जाणे सोपे नसते. पण प्रयत्नाने ते जमते. एकमेकांना समजू घेत, एकमेकांचा आदर करीत प्रेमो हे नाते छान फुलते. परंतु, त्यासाठी मनाचा थोडा संयम हवा आजकाल हे फार कठीण झाले. म्हणूनच संसार लवकर मोडण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या छोट्या गोष्टींची दखल न घेणे, खूप अपेक्षा ठेवणे, खर्चाची किंवा कष्टाची तयारी फक्त एकाच बाजूने असणे, अनाठायी अभिमान ही सारी कारणे विनाशाला कारणीभूत होत आहेत. पण नवीन व्यक्तीने जर समजून घेतले तर सामावणे कठीण नाही पण सामावून जाणे नकोच आहे.

संसाराच्या लोणच्याला टिकवायचे असेल तर छोट्या मैत्रिणींनो काही गोष्टी त्यात पडण्यापूर्वीच विचारात घ्या. मला ते जमणार नाही असा दुराग्रह नको. थोड्या गोड बोलण्याने, संवादाने, प्रेमाने, जिव्हाळ्याने, माणुसकीने वागल्यावर हे डावीकडची जेवणाची रंगत वाढविणारे लोणचे जसे जेवणाची चव वाढवते तसा संसार आपल्या जीवनाची गोडी वाढवतो.

– आरती मोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)