मुरली मनोहर जोशींची सक्रियता (अग्रलेख)

मोदींच्या एकाधिकारशाहीमुळे पक्षात मोठा असंतोष निर्माण झाला असल्याचे अरूण शौरी, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या ज्येष्ठांकडून वारंवार सांगितले गेले असले, तरी मोदी समर्थकांनी त्यांची संभावना मात्र “जॉब सिकर’ अशी करून त्यांच्या विरोधाला दुर्लक्षित केले आहे. “केवळ मंत्रिपद नाकारल्यामुळेच हे नेते असे तिरकस वागत आहेत,’ असे पक्षाकडून भासवले जात आहे. तथापी मुरली मनोहर जोशी यांची गणना त्यांना या पंक्तीत करता येणार नाही. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे यशवंत सिन्हा, अरूण शौरी, शत्रुघ्न सिन्हा, यांच्या पाठोपाठ आता आणखी एका प्रभावशाली पक्षांतर्गत विरोधकाला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. हे नवे नाव आहे मुरली मनोहर जोशी यांचे. अद्याप तरी ते उघडपणे मोदी विरोधातील कॅम्पमध्ये सहभागी झालेले नसले तरी, त्यांची एकूण पावले मात्र त्याच दिशेने पडत असल्याची चिन्हे आहेत. एक तर, संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना परस्पर एक पत्र पाठवून भारतीय बॅंकांचा एनपीए कसा कमी करायचा याचा सल्ला मागितला आहे.
जोशी यांनी राजन यांना पाठवलेल्या पत्रामुळे मोदी सरकारवर नाचक्कीची वेळ आली आहे. ज्या राजन यांना अपमानास्पदरित्या रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदावरून पायउतार होऊन भारताबाहेर जावे लागले होते, त्याच राजन यांच्याकडे मोदी सरकारच्यावतीने कोणाला तरी सल्ला मागण्यासाठी जावे लागणे, ही मोदी सरकारसाठी नाचक्कीच आहे. सरकारने आपली हार मानल्याचीच ही एक प्रकारे कबुली होती, असे चित्र यामुळे निर्माण झाले आहे. मुरली मनोहर जोशी यांनी राजन यांना पाठवलेले हे पत्र मोदींच्या संमतीने पाठवले होते, याचा अजून तरी पुरावा उपलब्ध नाही किंवा सरकारमधील कोणीही अजून या विषयावर बोललेले नाही.
मोदींना अडचणीत आणण्यासाठीच हे पाऊल मुरलीमनोहर यांच्याकडून नियोजनबद्धपणे उचलले गेले असावे, असा रागरंग दिसतो आहे. सरकारची गोची करण्याचे लक्ष्य मुरलीमनोहर यांच्या पत्राने साधले गेले आहे. अत्यंत चाणाक्षपणे त्यांनी ही कामगीरी बजावली आहे. या विषयावरून उठलेले वादळ शांत व्हायच्या आतच जोशी यांनी मुंबईत जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तासभर खासगीत भेट घेतली आहे. या भेटीचा अन्वयार्थ अजून नीट लागलेला नाही किंवा उद्धव ठाकरे अथवा शिवसेनेतर्फे यावर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
ठाकरे-जोशी यांच्या मुंबईतील गुप्त भेटीत नेमके काय घडले असावे, याची उत्सुकता राजकीय निरीक्षकांना आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये राहुन मोदी सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे आणि त्यांच्या चुकांबद्दल रोजच त्यांच्यावर टीका करणारे नेते म्हणून उद्धव ठाकरे परिचीत आहेत. त्यांची मुरली मनोहर जोशी यांनी भेट घेणे, याला निश्‍चीतच राजकीय महत्व आहे. “मोदींचा निरोप्या’ म्हणून त्यांनी उद्धव यांची भेट घेतली असण्याची शक्‍यता फारच कमी आहे. कारण पक्षात मुरलीमनोहर जोशी यांचे स्टेटस (दिवंगत) अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या बरोबरीचे आहे. त्यामुळे मोदींचा निरोप घेऊन जोशी हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्‍यता दुरापस्त आहे. तरीही ते ठाकरेंना खासगीत भेटून आले आहेत, याचा अर्थ ते आता मोदींच्या विरोधात सक्रिय झाले आहेत, असे मानायला जागा आहे.
“मी दिल्लीत नजरकैदेत आहे,’ असे उद्‌गार त्यांनी अलिकडेच त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या काही जणांशी बोलताना काढले होते, असे सांगितले जाते. मुरली मनोहर जोशी हे पक्षातील एक बडे नाव आहे. “अटल पर्व’ संपले, आडवाणी अडगळीत पडले आणि मुरली मनोहर यांनाही पद्धतशीर दूर ठेवले गेले. पण तरीही त्यांनी आपल्यावरील अन्यायाबाबत मौन सोडलेले नाही. अधुनमधून त्यांच्यावर सरकारी मेहरबानी होत असते. त्यातून त्यांना खूष ठेवण्याचा किंवा शांत ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. गेल्याच वर्षी त्यांना “पद्‌मविभूषण’ या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले गेले होते. संसदेच्या एका महत्वाच्या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
वयाचा निकष लाऊन त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले गेले असले, तरी अजून ते राजकारणात पूर्ण सक्रिय आहेत. कानपुरचे विद्यमान खासदार असलेले मुरली मनोहर हे तसे नेमस्त राजकारणी आहेत. जादा उचापती न करता पक्षाच्या शिस्तीत वावरणारे हे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी आपले उपेक्षितपण निमूटपणे सोसले आहे. पण त्यांच्या मनातील उपेक्षितपणाची खदखद कधी ना कधी बाहेर येणारच होती. आता बहुधा त्यांनी याच नाराजीपणाला वाट करून देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. अन्यथा, त्यांनी अशा प्रकारच्या, मोदींना अडचणीच्या ठरणाऱ्या हालचाली करण्याचे कारण नव्हते.
मोदींच्या एकाधिकारशाहीमुळे पक्षात मोठा असंतोष निर्माण झाला असल्याचे अरूण शौरी, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या ज्येष्ठांकडून वारंवार सांगितले गेले असले, तरी मोदी समर्थकांनी त्यांची संभावना मात्र “जॉब सिकर’ अशी करून त्यांच्या विरोधाला दुर्लक्षित केले आहे. “केवळ मंत्रिपद नाकारल्यामुळेच हे नेते असे तिरकस वागत आहेत,’ असे पक्षाकडून भासवले जात आहे. तथापी मुरली मनोहर जोशी यांची गणना त्यांना या पंक्तीत करता येणार नाही.
ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्यातील सहनशीलतेचाही बांध फुटु शकतो, असाच सध्याचा रागरंग दिसतो आहे. राजकारणात स्वत:चे वर्चस्व निर्माण करणे, हे अत्यंत स्वाभाविक असले तरी त्याबाबत अत्यंत टोकाची भूमिका घेऊन पक्षातील सारेच विरोधक गुंडाळून ठेऊन मोदींना फार काळ राजकारण करता येणार नाही. भारतीय जनता पक्ष हा भारतीय लोकशाहीत एक वैशिष्टपूर्ण भूमिका बजावणारा पक्ष आहे. या पक्षाच्या नेतृत्वाला पक्षात एकतर्फी बेबंदशाही निर्माण करता येणार नाही. या प्रकाराविरोधात पक्षातूनच आव्हान उभे राहू शकते. अचानक सक्रिय झालेल्या मुरली मनोहर जोशींच्या हालचाली तरी हेच सूचित करणाऱ्या आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)