मुरमे… सुंदर चेहऱ्याला शापच

   डॉ. जयदीप महाजन

आपल्या सुंदर चेहऱ्यावर येणारी मुरुमे म्हणजे सौंदर्याला शापच म्हणावा लागेल. तारूण्यात पदार्पण करताना बऱ्याच जणांना ही मुरुमे सतावत असतात. यालाच तारूण्यपीटिका असेही म्हणतात.काहींना ही मुरमे वयाच्या 12-13 व्या वर्षी येऊ लागतात. मुलींमध्ये याचे प्रमाण वयाच्या 14-16 व्या वर्षात तर मुलांमध्ये वयाच्या 16-17 व्या वर्षात सर्वात जास्त असते. 90 टक्‍के मुलामुलींत वयाच्या 23 ते 25 वर्षापर्यंत मुरमे कमी होतात. परंतु 5 टक्‍के स्त्रियांमध्ये व 1 टक्‍का पुरूषांमध्ये वयाच्या 30-40 व्या वर्षीही मुरमे येतात.

मुरमांमुळे आपला चेहरा तर खराब दिसतोच आणि सौंदर्यवृध्दीला अटकाव येतो. त्यामुळेच मुरमांपासून सुटका होण्यासाठी अनेकजण निरनिराळे उपचार करताना आढळतात.चेहऱ्यावर निरनिराळी क्रीम्स, लोशन्स, लेप इत्यादी लावले जाते . काहीजण तर ह्या मुरमांवर शस्त्रक्रियाही करुन घेतात.काही वेळेस चुकीच्या उपायाने, चुकीच्या सल्ल्याने किंवा चुकीच्या मार्गदर्शनाने मुरमे कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्‍यता अधिक असते. अशी मुरमे होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात.

तारूण्याच्या उंबरठ्यावर शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत खूप बदल होतात. त्यामुळे त्वचेवरील तैलग्रंथी (सिंबॉसिअस ग्लॅन्डस) अधिक कार्यरत होतात. त्यातून तैल स्त्राव (सिबम) जास्त प्रमाणात स्रवू लागतो. त्यातच त्वचेवरील केराटनयडेशन या विशिष्ट प्रक्रियेमुळे तैलग्रंथीचे तोंड बंद होते व त्यातील स्रावास त्वचेवर येण्यास अडथळा निर्माण होतो. त्यानंतर त्यामध्ये जंतूसंसर्ग होतो व या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून मुरमे तयार होतात.इतर अनेक गोष्टीही मुरमे वाढविण्यास कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. अनेक मुलींमध्ये मासिक पाळीच्या वेळी मुरमे वाढतात. त्याचप्रमाणे मानसिक ताण, तणावही कारणीभूत ठरतात.

चेहऱ्यावर लावण्यात येणारी निरनिराळी तेलकट मलमे हे सुद्धा मुरमे वाढण्यास कारणीभूत होऊ शकतात.आहारात विशिष्ट खाद्यपदार्थ उदा. चॉकलेट, शेंगदाणे, तळलेले पदार्थ खाण्यात आले तर अशा मुरुमांचा त्रास सुरु होतो.काही चुकीची औषधेही मुरमे वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात.मुरमे मुख्यत: चेहरा, मान, खांदे, दंड, छाती, पाठ या ठिकाणी येतात कारण या ठिकाणी तैलग्रंथी अधिक विकसित व कार्यरत झालेल्या असतात.मुरमे मुख्यत: बारीक पुटकुळीसारखी येतात पण प्रसंगी जाड गाठींसारखी (नोड्युलर) येऊ शकतात. बऱ्याच वेळा त्यामध्ये पू होतो.

उपाय : अनेक होमिओपॅथिक औषधे मुरमांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध झाली आहेत. या औषधांद्वारे मुरमांवर उपचार करताना त्या व्यक्तीच्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास केला जातो. मुरमांचा प्रकार, ती वाढण्याचा, कमी होण्याचा काळ, कारणे, त्याची शरीरावरील विभागणी म्हणजे मुरमे कोणत्या भागावर जास्त आहेत याचाही विचार केला जातो. मुरमांच्या लक्षणाबरोबरच इतर शारीरिक व मानसिक लक्षणांचा विचार करून औषधे दिली जातात. अशा मुरुमांवर काही इलाजही आहेत. मुरमांवर उपचार करताना काही बाबी लक्षात ठेवून त्यांचे पालन करणे आवश्‍यक ठरते.चेहरा साबणाने दिवसातून 3-4 वेळा धुवावा. त्यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो. तसेच तैलरंध्रे मोकळी होण्यास मदत होते. चेहऱ्याला वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही मलम लावू नये. कोणत्याही औषधाने मुरमे वाढली असतील तर त्वरित सल्ला घ्यावा.मुरमे नखाने कधीच फोडू नयेत तसे केल्याने जंतूसंसर्ग होण्याचा धोका संभवतो. अशी काळजी मुरुमांच्या बाबतीत घेतली तर लवकरच आपली ह्या शापातून मुक्तता होईल आणि आपला चेहराही सुंदर होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)