मुख्यसभेत कालवा भिंत फुटल्याचे तीव्र पडसाद

पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाला धरले जबाबदार : दोषींवर कारवाईची मागणी

पुणे – मुठा उजवा कालव्याची भिंत कोसळल्याचे पडसाद गुरूवारी महापालिका मुख्य सभेत उमटले. स्थानिक नगरसेवकांनी याविषयात पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाला जबाबदार धरत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुठा उजव्या कालव्याच्या भिंतीला भगदाड पडल्याबाबत महापालिका प्रशासनाला या आधीही कळवले होते. त्याची छायाचित्रेही दिली होती. एवढेच नव्हे तर, येथे भिंत बांधण्यासंदर्भात 6 महिन्यांपूर्वी वॉर्डस्तरिय निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, प्रशासनाने काहीच दखल घेतली नसल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका प्रिया गदादे यांनी केली. तसेच स्थानिक नगरसेवक आनंद रिठे आणि स्मिता वस्ते यांनीही प्रशासनाविरुद्ध मुख्यसभेत तक्रार करत खंत व्यक्त केली.

ही घटना दिवसा घडली त्यामुळे तत्परतेने मदत देता आली. परंतु, ही घटना रात्री घडली असती तर, किती मोठी जीवितहानी झाली असती याची कल्पना न केलेलीच बरी अशी भिती गदादे यांनी केली. भिंतीला उंदीर-घुशींनी पोखरल्यामुळे भगदाड पडल्याचे हास्यास्पद उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे गदादे म्हणाल्या. वास्तविक केबल कंपन्यांनी केलेल्या खोदाईमुळे या भिंतीचा भराव खचून भिंत पडल्याचा आरोप गदादे यांनी केला. संबंधित केबल कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही गदादे यांनी केली.

या घटनेमुळे महापालिका अधिकारी आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांचा आम्ही निषेध करतो. पुन्हा असे प्रकार घडले तर, अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही, असा इशारा गदादे यांनी दिला. तसेच पीडितांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणीही त्यांनी केली. सरस्वती शेंडगे, बाबुराव चांदेरे, दिलीप बराटे, पृथ्वीराज सुतार, प्रसन्न जगताप, दत्ता धनकवडे, प्रशांत जगताप, सुभाष जगताप, रघुनाथ गौडा, योगेश ससाणे, बाळा ओसवाल, गोपाळ चिंतन, अजित दरेकर, अनिता कदम यांनीही प्रशासनाच्या कारभाराबाबत खंत व्यक्त केली. विरोधी पक्षातील सदस्यांनी पाटबंधारे खात्यावरही आरोप केले.

अंधेर नगरी, चौपट राजा’ असा हा प्रकार आहे. एका बाजूला पाणी मिळत नाहीत आणि दुसरीकडे असलेले पाणी दुसऱ्याच भागाला पाठवले जात आहे. पाटबंधारे खाते महापालिकेकडून कोट्यवधी रूपये घेतात; परंतु कोणतीच जबाबदारी पार पाडत नाही.

–  चेतन तुपे, विरोधी पक्षनेते


गणपती विसर्जनासाठी पाणी सोडले नाही. सिंचनासाठी किती पाणी सोडत आहेत. याची माहिती आजपर्यंत दिली गेली नाही. कालवा समितीची बैठक वेळेत घेतली नाही. दौंड आणि बारामतीच्या औद्योगिक भागासाठी चोरून पाणी सोडले जात आहे. त्याचा खुलासा पाटबंधारे खात्याने करायला हवा. या कालव्याच्या दुरुस्तीचे काम पाटबंधारे खात्याचे आहे. याची जबाबदारी महापालिकेची नाही तरीही, खात्याकडून त्याची दुरुस्ती केली जात नाही. महापालिकेचे शिल्लक असलेल्या पाच-सहा हजार फ्लॅटमध्ये या दुर्घटनेतील बाधितग्रस्तांचे पुनर्वसन करा.

– अरविंद शिंदे, कॉंग्रेस गटनेते 

अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांचा खुलासा
ही दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख, अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. खडकवासल्यातून सुरू असलेला विसर्ग तातडीने बंद करण्यात आला. जिविताला धोका निर्माण झाल्यास तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी 8 ऍम्ब्युलन्सची सोय करण्यात आली. ज्या लोकांची घरे बाधित झाली आहेत, त्यांना तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. दोन शाळांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आणखी गरज लागल्यास त्याचीही महापालिकेकडून सोय करण्यात येणार आहे. झालेल्या घटनेकडे नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहिले जावे आणि त्यानुसार मदत मिळावी, असा प्रस्ताव राज्यसरकारला पाठवण्यात येणार आहे. याशिवाय पीडितांना मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतून मदत मिळावी, अशी मागणीही प्रस्तावाद्वारे करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर, शहरभरात असलेल्या कॅनॉलचे ऑडिट करण्याची मागणी पाटबंधारे खात्याकडे करणार आहे. ज्या ठिकाणी अशा काही दुरुस्ती करायच्या असतील तेथे तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात पाटबंधारे खात्याला विनंती करण्यात येईल, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ महापालिका देऊ शकेल, असेही पाटबंधारे खात्याला कळवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)