मुख्यमंत्री फडणवीस उद्या शिक्रापूरमध्ये

आदित्य ठाकरेंच्या उरुळीकांचन, हडपसरमध्ये प्रचारसभा

शिक्रापूर-शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असताना शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांची शिक्रापूर येथे उद्या दुपारी 2 वाजता जाहीरसभा होणार आहे. तर शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उरळीकांचनला दुपारी तीन व हडपसर येथे सायंकाळी सात वाजता सभा होणार आहेत.

शिवसेनेचे खासदार असलेल्या आढळराव पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी खूपच जवळचे संबंध असल्याचा उपयोग करुन घेत आढळराव पाटील यांनी अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली. अगदी पीएमआरडीएच्या माध्यमातून वाघोलीची पाणीयोजना असेल, एका दिवसात अष्टविनायक दर्शन करता यावे यासाठी ही सर्व देवस्थाने जोडणारे रस्ते असतील. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा, सर्वोच्च न्यायालयात वकील द्यावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना मुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकार्य लाभले होते. शिवनेरीसह जुन्नर परिसरातील किल्ल्यांचा विकास करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची आढळराव पाटील यांची मागणीही त्यांनी पूर्ण केली. वढू-तुळापूरच्या संभाजीराजांच्या समाधिस्थळाचा विकास करण्यासाठीही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांनी 15 वर्षांत काय केले? खेडचा विमानतळ का रद्द झाला हेही मुख्यमंत्री आपल्या भाषणात स्पष्ट करणार का याबाबतही उत्सुकता आहे.

निवडणुका जाहीर झाल्यापासून शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा शिरुर लोकसभा सतदारसंघात हा तिसरा दौरा असून शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे सध्या तरुणाईत मोठी क्रेझ असणाऱ्या आदित्य ठाकरेंची दुपारी 3 वाजता हवेली तालुक्‍यातील उरळीकांचन येथे तर सायंकाळी 7 वाजता हडपसर माळवाडी येथील साम्राज्य चौकाजवळ अशा दोन सभा होणार आहेत. भाजप-शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी गेले काही दिवस मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे खासदार आढळराव पाटील यांना अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांची सभा होणार असल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.