मुख्यमंत्रीपद फिफ्टी फिफ्टी

कॉंग्रेसला पाच वर्ष उपमुख्यमंत्री पद; अखेर सत्ता वाटपाचं सूत्र ठरलं

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता वाटपात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रोटेशन पध्दतीने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद वाटून देण्यात येणार आहे.त्यानुसार शिवसेनेला पहिल्या अडीच वर्षासाठी तर राष्ट्रवादीला नंतरच्या अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्यात येईल. त्याचवेळी कॉंग्रेसला मात्र संपूर्ण पाच वर्षासाठी उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या फॉर्म्यूल्यावर तडजोड झाल्याचे दोन्ही कॉंग्रेसमधील वरीष्ठ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आम्ही रालोआतून बाहेर पडलो नसल्याचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा अध्यक्षांना दिल्याने त्याची चर्चा सुरू झाली. पेढ्याची ऑर्डर द्यायची वेळ आली आहे, असा शब्दात सत्ता वाटपाचा तिढा सुटल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी रात्री उशीरा पत्रकारांना दिले.

पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, छगन भूजबळ, अजित पवार आणि नवाब मलिक उपस्थित होते. तर कॉंग्रेसच्या बाजूने अहमद पटेल, केसी वेणूगोपाल, पृथ्वीराज चौहान, बाळासाहेब थोरात, जयराम रमेश उपस्थित होते. या बैठकीत सत्तास्थापनेत कशा पध्दतीने सहभागी होता येईल, त्याचबरोबर पारंपरिक मतदार तुटणार नाही, याची चाचपणी करण्यात आली. या दोन्ही पक्षात दीर्घकाळ बैठक झाली. त्यात हा फॉर्म्युला मान्य करण्यात आला. यायबाबत शिवसेना नेतृत्वाशी संपर्क साधण्यात आला. त्याला त्यांच्याकडूनही होकार मिळाला. त्यामुळे याच फॉर्म्युल्यावर सरकार स्थापन करण्याबाबत निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीनंतर संजय राऊत यांना पत्रकारांनी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले, पेढ्याची ऑर्डर देण्याची वेळ आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे लवकरच तुम्हाला गोड बातमी देतील. यापेक्षा अधिक मी काही सांगणार नाही. राऊत यांच्या या प्रतिक्रियेने सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यात यश आल्याचे मानले जात आहे.

राज्यात भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या आहेत. मात्र, शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचे वाटपाची आग्रही भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षावर मुख्यमंत्रीपद देण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे त्या पक्षाने दोन्ही पक्षातील समन्वयाअभावी सरकार स्थापन करण्यात येत असल्याची सबब देत सत्ता स्थापनेचा हक्क सोडला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आहे. त्याचा फटका नागरिक आणि शेतकऱ्यांना बसत आहे. प्रशासन आहे की नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे पर्यायी सरकार बनवावे लागेल. त्यासंदर्भात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.

राऊतांची गुगली
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याची औपचारिक घोषणा केली नसतानाही शिवसेनेच्या राज्यसभेतील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आल्या बद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यकंय्या नायडू यांच्याकडे लेखी नाराजी व्यक्त केली. माझी आसन व्यवस्था तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली. हे शिवसेनेचा अपमान करण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक उचललेले पाऊल आहे. हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. आम्ही रालोआतून बाहेर पडण्याची औपचारिक घोषणा केली नसताना हे पाऊल उचलण्याची गरजच काय होती, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. या कृतीमुळे सभागृहाच्या औचित्याचा भंग झाला आहे. त्यामुळे आम्हाला 1/2/3 रांगेरत स्थान देऊन सभागृहाच्या परंपरेचे पालन करावे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.