मुंडण अंदोलन करून अधिकाऱ्यांचा निषेध

जानाई शिरसाई योजनेचे पाणी सोडण्याबाबत सरकार उदासीन

वासुंदे- उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथे जानाई शिरसाई योजनेचे पाणी सोडण्यासाठी केलेल्या आंदोलनाने उपोषणाच्या सहाव्या दिवशी उग्र रूप धारण केले. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी काही तरुणांनी मुंडण आंदोलन करून शासनाच्या उदासीनतेचा निषेध केला.
उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथील दोन युवक शिवाजी जराड आणि दादासाहेब घुले यांनी सोमवार (दि. 4) संध्याकाळी पाचपासून गावातील टॉवरवर चढून आंदोलन चालू केले; परंतु पाणी सोडण्याबाबत पुढील चार दिवसांत निर्णय घेण्यात येईल आणि मंगळवारी (दि. 5) शेतकऱ्यांशी याबाबत भेट घेऊन निर्णय देतो आसे प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी सांगितल्याने टॉवरवरील युवक खाली उतरले. उपोषणकर्त्यांची भेट घेतली असता उपोषणकर्ते लेखी आश्वासन घेण्यावर ठाम राहिल्याने मार्ग निघाला नाही; परंतु मंगळवारी (दि. 5) दुपारपर्यंत लेखी आश्वासन दिले जाईल असे सांगण्यात आले होते; परंतु एक वाजेपर्यंत प्रांत यांच्या आश्वासनाची वाट पाहिली. मात्र, प्रांत शेतकऱ्यांना भेटण्यास न आल्याने आणि लेखी स्वरूपात आश्वासन न मिळाल्याने यावेळी काही तरुणांनी मुंडण अंदोलन करून प्रांत, जिल्हा अधिकारी, जलसंपदा विभागाचा जाहीर निषेध केला.
या अंदोलनास बारामती तालुक्‍यातील सर्व जिरायती पट्ट्यातील ग्रामपंचायतीचा पाठिंबा आसल्याचे मत उंडवडी कडेपठारचे सरपंच विशाल कोकरे यांनी व्यक्त केले. सलग सहा दिवस चाललेल्या उपोषणामुळे उपोषणकर्त्यांचे प्रकृती खालावत चाललेली आहे. मात्र, हे आंदोलन अजून उग्र स्वरूप धारण करेल आणि वेळ पडल्यास प्रांत यांच्या दारात अंदोलन करण्यात येईल, असा इशारा माझी सरपंच विठ्ठल जराड यांनी दिला .

  • उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथे जानाई शिरसाई योजनेचे पाणी सोडण्यासाठी तहसीलदार कार्यालयातून लेखी आश्वासन दिले जाईल, तशा सूचना दिल्या आहेत.
    – हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी, बारामती

Leave A Reply

Your email address will not be published.