मी युतीचा शुभचिंतक; युती कायम राहायला हवी

File photo....

केंद्रीयमंत्री नितिन गडकरी : महाराष्ट्रात चुकूनही येणार नाही
मुंबई – तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना… असेच युतीचे आहे. नवरा-बायकोमध्ये जशी भांडणात असतात तशीच युतीमध्येही कुरबुरी आहेत. पण मी युतीचा शुभचिंतक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझी श्रद्धा आहे. बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना-भाजप युती घडवली होती. आमची युती आहे आणि ती कायम राहिली पाहिजे, अशी भावना केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त करीत युतीचे संकेत दिले आहेत.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्वभूमीवर नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांनी शिवसेना-भाजपाच्या संभाव्य युतीबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गडकरी म्हणाले, आपण युतीचा शुभचिंतक आहे. लग्न झाल्यावर आदळआपट होत असते, जसे नवरा-बायकोत भांडण असते तशाच युतीतही काही कुरबुरी असतील. पण हे नाते तुझं माझं जमेना व तुझ्यावाचून करमेना असेच आहे. पुढील पंचवीस वर्षे आम्हीच राज्य करणार आहोत, असा विश्वास व्यक्त करतानाच राजकारणात कायमचे मित्र व कायमचे शत्रु नसतात. राजकारणात काहीही होऊ शकते असे विधानही यावेळी त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी राष्ट्रपती रा.स्व.संघाच्या कार्यक्रमाला जात असल्याबद्दल ते म्हणाले, संघ हा काही पाकिस्तानी नाही. ती राष्ट्रभक्त संघटना आहे. देशात जर लोकशाही अधिक बळकट करायची असेल तर राजकीय अस्पृश्‍यता संपली पाहिजे. या घटनेकडे याच दृष्टीकोनातून बघितले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

पालघर लोकसभा पोटनिवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ क्‍लिपबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठाराखण केली. मी देवेंद्रना लहानपणापासून ओळखतो. ते अतिशय सुसंस्कृत आहेत. कोणावरही इतके आक्रमक ते बोलणार नाहीत. साम, दाम, दंड, भेद याचा शब्दशः अर्थ न घेता पूर्ण शक्तीनिशी लढणे असा घ्यायला हवा. त्यांच्या बोलण्याचा भाव वेगळा होता, असेही गडकरी म्हणाले.

पोटनिवडणुकांतील ईव्हीएम बंद पडल्याबाबत विचारले असता, मशिन बंद पडणे ही बाब गंभीर आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतलीच पाहिजे. पण पंजाबमध्ये कॉंग्रेस जिंकली. कर्नाटकमध्ये मनासारखे सरकार आले की कॉंग्रेसला काही वावगे वाटत नाही. पण कुठे भाजपा जिंकायला लागली तर कॉंग्रेसला लगेच त्रास होतो, ही दुहेरी भूमिकाही योग्य नसल्याचे ते म्हणाले.

इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी निगडीत
विरोधी पक्षात असताना इंधनाच्या दरवाढीवरून आम्ही आंदोलने केल्याचे सांगून गडकरी म्हणाले,पेट्रोल-डिझेलचे दर आता आंतरराष्ट्रीय दराशी निगडित आहेत. त्यावरील सबसिडी आता काढून टाकली आहे. सबसिडीची रक्कम आता अन्य समाजोपयोगी कामांसाठी वापरण्यात येते असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र याच वेळी कांदा, टोमॅटो आदी अत्यावश्‍यक वस्तूंचे भाव अतिशय कमी झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. इथेनॉल, मिथेनॉल सारख्या स्वस्त इंधनांचा पर्याय स्वीकारल्यास हा त्रास देखील कमी होईल. मुंबईतील बेस्ट बसेसचे तिकिट अर्ध्यावर येईल असेही ते म्हणाले.

दिल्लीत रमलोय…
स्वतंत्र विदर्भासाठी भाजप अनुकुल आहे. भाजपाने नेहमीच छोटी राज्य निर्माण करण्याची भूमिका घेतली आहे. वेगळा विदर्भ करायचा असेल तर त्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागेल. त्यामुळे कॉंग्रेसच्या मदतीनेच संसदेत विधेयक मंजूर करावे लागेल असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातून दिल्लीत गेले तेव्हा सुरवातीला वाईट वाटले होते. पण आता दिल्लीत रमलो आहे. आता चुकुनही राज्यात येणार नाही. पक्षाने आदेश दिला तरी महाराष्ट्रात येणार नाही, असे गडकरी यांनी ठामपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)