कराड, दि. 12 (प्रतिनिधी)- खासदार म्हणून काम करत असताना जिल्ह्यामध्ये 18 हजार कोटींची कामे केली आहेत. तरीही विकास काय केला, असे मिशांना पिळ देऊन विचारणाऱ्यांना तो दिसत नाही. विरोधकांना मिशा पिळण्यातून वेळ मिळाला तर विकास दिसेल ना?, असा टोला खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी लागवला. वैयक्तिक पातळीवर टीका करण्याचे वेळीच थांबवावे, अन्यथा मी शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार भोसले म्हणाले, जिल्ह्यामध्ये खासदार निधीतून विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.अपुऱ्या माहितीवर विरोधक खासदारनिधी परत गेला आहे, अशा वल्गना करत आहेत. खोट बोलणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे.तुम्ही जर वैयकित्क पातळीवर टीका करणार असला तर मी ही गप्प बसणार नाही. माथाडी कामगारांची पिळवणूक करून तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचला आहात, हे आम्ही पुराव्यानिशी सिध्द करायला मागे पुढे पाहणार नाही.
जिल्ह्यातील विकास कसा करावा याचा आराखडा असणारा जाहीरनामा आम्ही तयार केला आहे, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी 14 एप्रिलला सातारा येथे या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा जाहीरनामा जनतेचा सर्वांगीण विकास साधणारा असणार आहे. संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तो प्रसिध्द करण्यात येणार आहे.