मिरजगाव आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल

डॉक्‍टरांची आणि सुविधांचीही वानवा; शवविच्छेदनगृह बंद
मिरजगाव – कर्जत तालुक्‍यातील मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था असून अडचण अन्‌ नसून खोळंबा अशी झाली आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला रुग्ण वैतागले असून हा चाललेला अनागोंदी कारभार थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था येथील कर्मचारी वर्गामुळे अतिशय दयनीय झाली आहे. या कर्मचाऱ्यांमुळे या केंद्राकडे रूग्णांना येणे महागात पडत आहे. डॉक्‍टराकडून उभ्या-उभ्यानेच तपासणी केली जाते, तर गोळ्या औषधे लिहून देऊन बाहेरील मेडिकलमधून आणावे लागेल, असे सांगितले जाते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मिरजगावसह छत्तीस गावातील रूग्णांना मोफत आरोग्य सेवा देणारे केंद्र आहे; परंतु येथील बाह्यरुग्ण विभाग दुपारी बारा वाजताच बंद केली जाते. परत चार वाजता येण्यास सांगितले जाते. लांबून रुग्ण आल्यानंतर त्यांना डॉक्‍टर आत्ताच बाहेर गेले असे सांगितले जाते. त्यामुळे खासगी दवाखान्यामध्ये जाऊन दोन पैसे गेले तरी चालतील; पण सरकारी दवाखाना नको रे बाबा, असे येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी “दै. प्रभात’ ला सांगत होते.
गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी एमबीबीएस डॉक्‍टर नाही. नियमानुसार या केंद्रावर दोन एमबीबीएसच्या जागा मंजूर आहेत. गेली पाच वर्षे येथे बीएचएमएस असलेले वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत होते; परंतु त्यांचीही दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. त्यांच्याजागी अद्याप दुसरे वैद्यकीय अधिकारी आले नाहीत. शिकावू डॉक्‍टरांच्या जिवावर रुग्णांना सोडले जात आहे. त्याचे गांभीर्य जिल्हा परिषदेला व तिच्या सदस्यांना नाही. अन्य राजकीय नेतेही या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नाही.
येथील शवविच्छेदन केंद्र पंधरा वर्षांपासून बंदच स्थितीमधे आहे. एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला, तर नातेवाईकांना खासगी वाहनांमधून कर्जत या तालुक्‍याच्या ठिकाणी घेऊन जावे लागते. तेथे ही चार ते पाच तास थांबावे लागते. मिरजगाव आरोग्य केंद्रात दोन्ही रिक्त असलेल्या जागी एमबीबीएस डॉक्‍टरांची नेमणूक करून मिरजगाव व परिसरातील रूग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरवावी, अशी मागणी मिरजगाव व परिसरातून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)