मावळात “मराठा’ गर्जना!

  • मावळ बंद यशस्वी : पुणे-मुंबई महामार्ग रोखला, पॅसेंजरही फटका

मावळ – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या “मावळ बंद’ला देहुरोड, इंदोरी, सोमाटणे, तळेगाव, वडगाव, पवनानगर, कामशेत, टाकवे बुद्रुक, कार्ला, लोणावळा परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगावचा आठवडे बाजारासह तळेगाव, कान्हे, टाकवे औद्योगिक वसाहतीमधील कारखाने बंद ठेवण्यात आले होते. याशिवाय पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे आणि जुना महामार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखला. त्यामुळे काही काळ तणाव आणि कोंडीचा सामना करावा लागला. मळवली रेल्वे स्थानकात मोर्चेकरी रेल्वे रूळावर आल्याने भुसावळ-पुणे रेल्वेगाडीला उशिराने धावली. मावळ तालुक्‍यातील शहरीभागासह ग्रामीण पटट्यातील “मराठा’ गर्जना यशस्वी ठरली.

कार्ला/लोणावळा – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकरिता गुरुवार दि. 26 ला मावळात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात येत असून कार्ला परिसरात देखील रास्ता रोको, रेल रोको करुन आंदोलनकर्त्यांनी मळवली स्टेशनला भुसावळ-पुणे रेल अडवून तसेच जुना पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन करून वाहतूक बंद पाडून मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्ला फाटा येथे सकाळी दहा वाजता कार्ला परिसरातील वेहरगाव, शिलाटणा, दहिवली, मळवली, पाटण, भाजे, सदापूर, मळवली, देवघर, वाकसई, मुंढावरे, टाकवे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी सुमारे एक तास कार्ल्या फाट्यावर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको केला. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नंतर सर्व आंदोलक कार्ला मळवली रेल्वे स्थानकात पायी पोहोचले. मळवली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रोको आंदोलन करून पुणे-भुसावळ पॅसेंजर गाडी रोखली. काही वेळ रेल्वे रोखल्यानंतर पोलिसी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना रेल्वे मार्गावरुन बाजुला करण्यात आले.

लोणावळा शहरातून व आजूबाजूच्या ग्रामीण भागातून आलेले शेकडो मराठा तरुण घोषणाबाजी करीत मोर्चात सहभागी झाले. लोणावळ्यातून राष्ट्रीय महामार्गाने वरसोली टोल नाक्‍याकडूनपुढे वलवण गावात एक्‍सप्रेस हाय वे रोखण्यासाठी मोर्चा वळला. मात्र या आंदोलकांना वलवण एक्‍झिट येथे पोलिसांनी रोखून धरले. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्या दरम्यान बाचाबाची होऊन काही वेळ तणाव निर्माण झाला. अखेर आंदोलकांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बैठक मांडत सुमारे दोन तास हा मार्ग रोखून धरला.

आंदोलकांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध यावेळी केला. आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या मावळ बंदला शाळा, महाविद्यालय, रिक्षा, टेम्पो वाहतूकदार व परिसरातील बाजार पेठा कडकडीत बंद ठेवला. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लोणावळा उप विभागीय अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे व लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)