मावळात बोगस दस्तनोंदणीचे पेव!

महसूलचा सावळा गोंधळ : न्यायासाठी मूळ मालक मेटाकुटीला
वडगाव मावळ – नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या डोंगररांगा आणि चोहोबाजूंनी सधन असलेल्या मावळ तालुक्‍यात बोगस जमीन खरेदीखत दस्त नोंदणीचे पेव फुटले आहेत. त्यामुळे मूळ मालकांना पोलीस, महसूल व न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. बोगस खरेदीखत दस्त नोंदणीच्या वाढत्या टोळक्‍यांवर ठोस कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मावळ तालुक्‍यात नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या डोंगररांगा, तसेच पवना, वडिवळे, आंध्रा, टाटा धरण (ठोकळवाडी), मळवंडी (ठुले), कुसगाव व जाधववाडी आदी धरणे आहेत. तसेच मावळ तालुक्‍यात इंद्रायणी, पवना, कुंडलिका, आंद्रा, सुधा या नद्या असून, तालुक्‍यात मुबलक पाऊस पडत असतो. तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा व खंडाळा प्रसिद्ध मिळते. मावळ तालुक्‍यातून पुणे-मुंबई जुना महामार्ग, द्रुतगती मार्ग, तळेगाव दाभाडे-चाकण राज्य मार्ग, पुणे-मुंबई लोहमार्ग तसेच औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व पर्यटन क्षेत्र आहेत. शिवकालीन गडकिल्ले व लेण्या तसेच सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल्या पुणे-मुंबई महानगराच्या मध्यवर्ती असलेला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यातील जमिनीचे आकर्षण नेते, अभिनेते, उद्योजक, अधिकारी व धनिकांना आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुंतवणूकदारांना जमिनीचा मोह
मावळ तालुक्‍यात काही टोळ्या जमिनींचे बोगस खरेदीखत, दस्त नोंदणी राजरोसपणे करीत आहेत. त्या मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील तसेच देशातील धनिकांना मावळातील जमिनीच्या वाढत्या किमंती तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती व पायाभूत सुविधांची माहिती देऊन त्यांना जमिनीच्या मोहात पडले जाते. त्यात पोलीस, महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने या टोळ्या मावळ तालुक्‍यातील अशिक्षित व अज्ञानी मूळ शेतकऱ्यांच्या जमीन मालकांचे त्यांना थांगपत्ता न लागू देता, त्यांच्या नावाची बोगस मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, लाईट बिल व बॅंक पासबूक बनविले जाते. त्याच शेतकऱ्यांच्या जमीन मालकांच्या ठिकाणी बोगस व्यक्ती उभे करतात.

बोगस ओळखपत्रांसह व्यक्‍तींचा लवाजमा
या टोळ्या पोलीस, महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाखो रुपये देऊन “तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशा पद्धतीने नवीन शर्तची जमीन असेल, तर बोगस ओळखपत्रे व व्यक्‍ती उभ्या करून प्रथम बोगस साठेखत, कुलमुखत्यार दस्त करतात. त्यासंदर्भात कुळकायदा शाखेची खरेदी-विक्रीची परवनागी घेण्यासाठी मागेल ती रक्‍कम दिली जाते. तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी संबधित जागेबाबत खोटे जाबजवाब अहवाल देऊन तो कुळकायदा शाखेला पाठवितात. खालसा जमीन असल्यास बोगस ओळखपत्रे व व्यक्‍ती उभ्या करून खरेदीखत दस्त नोंदणी केले जाते.

मूळ जमीन मालकांना धास्ती
मूळ जमीन मालकास याबाबत थांगपत्ता लागत नाही, काही कारणास्तव मूळ जमीन मालक सातबारा उतारा काढतो, तेव्हा आपली जमीन विकल्याचे कळते. शेतकरी सर्व कागदपत्रे जमा करून फसवणूक झाल्याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्यास पोलीस त्या मूळ शेतकऱ्यांना हा “दिवाणी दावा न्यायालयात दाखल करा’ असे सांगून त्यांना हकलून देतात. त्यानंतर ते शेतकरी अज्ञानी व अशिक्षित असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची पोलीस धमकी देतात. त्यामुळे फसवणूक झालेले शेतकरी न्यायालयाचे उंबरठे झिजवितात.

तलाठी कार्यालय ते मंत्रालय “कनेक्‍शन’
बोगस खरेदीखत दस्त नोंदणी व्यवहारात मंत्रालयातील अधिकाऱ्यांपासून स्थानिक अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. मावळातील फसवून घेतलेली शेती अधिकाऱ्यांच्या पत्नी, नातेवाईक, मित्र व चालक यांच्या नावावर आहेत. मूळ शेतकऱ्याला गुंडांकरवी धमक्‍या दिल्याने ते शेतकरी जीवाच्या भीतीने गप्प राहतात. अशा टोळ्यांमुळे मूळचा शेतकरी देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. मावळ तालुक्‍यातील बोगस खरेदी खत, साठेखत व कुलखमुत्यार दस्त नोंदणी करणाऱ्या टोळ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत झाल्यावर फेरफार करून सात-बारा उताऱ्यावर नाव नोंदवावे लागते. तलाठी व मंडलाधिकारी यांनी पूर्ण कायदेशीर चौकशी, सूचना व अहवाल सादर करुनच नोंद करणे आवश्‍यक आहे. जर फसवणूक झाली, तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून खरेदीखत रद्द करावे.
– रणजीत देसाई, तहसीलदार, मावळ.

बोगस खरेदीखत, साठेखत व कुलमुखत्यार दस्त नोंदणी होणार नाही, यासाठी मूळ शेतकरी, साक्षीदार व जमीन घेणार यांच्या मूळ कागदपत्रांची पूर्ण शहानिशा केली जाणार आहे. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, अशा बोगस खरेदीखत, साठेखत व कुलमुखत्यार दस्त करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवणार आहे. बोगस दस्तावेज होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. जमीन खरेदी-विक्री करताना जमिनीची संपूर्ण माहिती घेऊनच जमीन खरेदी-विक्री केली जाईल.
– जितेंद्र बडगुजर, दुय्यम निबंधक, वडगाव मावळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)