वाघोली- अगोदर झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून महिलेच्या घरात घुसून मारहाण व विनयभंग केल्याची घटना माळवाडी (आव्हाळवाडी, ता. हवेली) येथे घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार (दि.23) जुलै रोजी दुपारी घडला. रवींद्र उत्तम मोरे, तेजस रवींद्र मोरे, तुषार रवींद्र मोरे (रा. विठ्ठलमंदिराशेजारी, माळवाडी, आव्हाळवाडी, ता. हवेली), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाचा राग मनात धरून माळवाडी (ता. हवेली) येथील महिलेच्या घरात घुसून तिघांनी पतीला फरफटत नेऊन मारहाण केली.
यावेळी महिलेने माझ्या पतीला का मारहाण करता, असा जाब विचारला. त्यावेळी एकाने महिलेचा हात पकडून दुसऱ्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तिला डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच तुम्ही सारखे पोलीस स्टेशनाला का जाता, तुमचे पायच काढून टाकतो, अशी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.