मालवाहतूकदारांचा संप अखेर मागे

बहुतांशी मागण्या मान्य केल्याने घेतला निर्णय
पुणे,दि.27(प्रतिनिधी)- गेले आठ दिवसांपासून सुरु असणारा माल वाहतूकदारांचा देशव्यापी संप आज रात्री उशीरा झालेल्या बैठकीत मागे घेण्यात आला. मालवाहतूकदारांच्या सर्व मागण्या या लेखी स्वरुपात मान्य केल्याने हा निर्णय घेतला असल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपामुळे बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. बाजारपेठेत माल येत नसल्यामुळे अनेक वस्तूंचे दर ही वाढले होते. या पार्श्‍वभूमीवर आज केंद्र सरकारच्यावतीने मालवाहतूक दारांना बैठकीसाठी बोलविण्यात आले होते. या बैठकीला ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसचे फुलचरण अटवाल, मलकितबल अमृतलाल मदान आणि बाबा शिंदे उपस्थित होते. केंद्रिय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत ही बैठक झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या बैठकीत मालवाहतूकदारांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. माल वाहतूकदारांना देशभरात टोल भरावा लागू नये अशी मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. यापुढील काळात मालवाहतूकदार ज्यावेळी आपल्या वाहनांचे परवाने नुतनीकरण करतील त्याचवेळी त्यांच्याकडून एकदम टोलची रक्कम भरुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात प्रत्येक ठिकाणी टोल भरावा लागणार नाही. यावेळी काही मालवाहतूकदारांच्या गाड्या या देशभर प्रवास करतात तर काही गाड्या या फक्त राज्यातच वाहतूक करतात. अशांना टोलची रक्कम ही वेगवेगळी असणार आहे, त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तीन आणि केंद्र सरकारचे तीन प्रतिनिधी असणार आहे. ही समिती याबाबतची रक्कम लवकरच निश्‍चित करेल. त्याचबरोबर छोट्या छोट्या मालवाहतूक दारांना इनकॅम ट्रॅक्‍स, ई-बील आणि जीएसटी मध्ये काही अडचणी व त्रुटी जाणवित आहेत याबाबत सुद्धा केंद्र शासनाने सकारात्मकता दर्शवित टोल साठी जी समिती नेमण्यात येणार आहे ती समिती सुद्धा यातील त्रुटी दूर करुन मालवाहतूकदारांना सोयीचे अशाप्रकारे त्याचे नियोजन करणार आहे.
वाहनांच्या इश्‍युरन्स मध्ये सुद्धा 28 टक्‍यांनी वाढ करण्यात आली होती. ही वाढ कमी करुन आता 15 टक्‍यांपर्यत आणण्यात आली आहे. त्याचबरोबर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाना नुतनीकरण दर वर्षाला करावे लागायचे ते आता दोन वर्षानी करावे लागणार आहे. या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे.

या बैठकी संदर्भात अधिक माहिती देताना ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसचे पदाधिकारी बाबा शिंदे म्हणाले, देशभरात डिझेलचे दर एक सारखे असावेत ही आमची मागणी त्यांनी मान्य केली नाही. हा प्रश्‍न पेट्रोलियम कंपन्यांच्या अखत्यारित असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करावी लागेल पण येत्या दोन महिन्यात डिझेलचे दर कमी होतील असे आश्‍वासन दिले आहे.आजच्या बैठकीत सर्वच विषय मार्गी लागल्याने, गेले आठ दिवसांपासून सुरु असणारा देशव्यापी संप मागे घेत आहोत. उद्यापासून(शनिवार)सर्व मालवाहतूक गाड्या रस्त्यावर सुरळीत धावतील असे ही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)