मालमत्तेची नोंद होण्यासाठी ग्रामपंचाय व जिल्हा परिषदेकडून टाळाटाळ

नारायणगावात 16 एप्रिलला आत्मदहन करण्याचा कविता व अनिकेत पाटे यांचा इशारा

नारायणगाव- येथील कविता अशोक पाटे यांच्या नावाने मालमत्तेची नोंद नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये होण्यासाठी जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती जुन्नर व ग्रामपंचायत नारायणगाव यांच्याकडून अन्याय केला जात असून जाणीवपूर्वक नोंद न घालण्यासाठी टाळाटाळ करत आहे व ग्रामपंचायत ही अभिजित पाटे यांच्या बाजूने असल्याचा असा आरोप कविता पाटे आणि अनिकेत पाटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

अशोक पाटे यांच्या 21 जानेवारी 2011 च्या नोटरी केलेल्या मृत्युपत्राप्रमाणे प्रॉपर्टीची नोंद केवळ पत्नी कविता पाटे यांच्या नावावर व्हावी यासाठी कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे; परंतु याकामी कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात सुरू असताना ग्रामपंचायत नारायणगाव, जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती हे न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करून न्यायालयीन वादविवाद सुरू असताना राजकीय दबावाखाली काम करत असून, प्रॉपर्टीची नोंद करण्यासाठी जाणूनबुजून विलंब लावत आहे. एक महिला लोकप्रतिनिधी व त्यांचे दोन समर्थक हे कविता पाटे यांच्या नावाने नोंद होऊ नये यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पुणे यांच्यावर दबाव टाकत आहे, असा आरोप कविता पाटे आणि अनिकेत पाटे यांनी केला आहे. या संदर्भात सर्व कायदेशीर कागदपत्रे खेड न्यायालय, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत नारायणगाव येथे सादर केली आहेत. ग्रामपंचायतीने कविता पाटे यांच्याच नावाने नोंद येत्या पंधरा दिवसात केल्या नाही तर आम्ही नारायणगाव ग्रामपंचायतीसमोर आत्मदहन करू, असा इशाराही या पत्रकार परिषदेत कविता व अनिकेत पाटे यांनी दिला आहे.

  • कविता पाटे व अभिजित पाटे यांच्यातील घरगुती वाद हे खेड व जुन्नर न्यायालयात सुरूआहेत. कविता पाटे, अभिजित पाटे व अनिकेत पाटे या तिघांच्या नावाची 28 जून 2017 साली वारस नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कविता पाटे यांनी खेड न्यायालयालयात दावा दाखल केला असल्याने हे प्रकरण न्यायालयीन बाब आहे. याबाबतचा अहवाल व नोंदी बाबतची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला पाठवून जिल्हा परिषदेने दिलेल्या आदेशानुसार ज्या काही नोंदी झाल्या आहेत त्या “जैसे थे’च ठेवाव्यात व न्यायालयाचा निकाल होईपर्यंत तिघांच्या नोंदी करून शेऱ्यात वादग्रस्त नोंद अशी नोंद करावी. याबाबतीत कोणावरही अन्याय होणार नाही, ही भूमिका ग्रामपंचायतीची आहे.
    – नितीन नाईकडे, ग्राम विकास अधिकारी, नारायणगाव ग्रामपंचायत

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.