मालगाडी पोहोचायला लागली तब्बल चार वर्ष !!

रेल्वेच्या तथाकथीत कार्यक्षम कारभाराची निघाली लक्तरं
गोरखपुर – खतांच्या गोण्या घेऊन निघालेल्या एका मालगाडीला 1326 किमीचे अंतर कापायला तब्बल चार वर्ष लागल्याची अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. विशाखापट्टणमहून खताच्या 1316 गोण्या घेऊन येणाऱ्या या मालगाडीचे बुकींग 10 नोव्हेंबर 2014 रोजी करण्यात आले पण प्रत्यक्षात ही गाडी उत्तरप्रदेशातील बस्ती स्थानकावर गेल्या बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला पोहचली.

या हैराण करणाऱ्या वृत्ताने अनेकांनी रेल्वेच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सुरू केले आहे. रेल्वे मालगाडीला हे 1326 किमीचे अंतर कापण्यात एरवी साधारण 42 तास 13 मिनीटांचा अवधी लागतो. या विलंबाबद्दल माहिती देताना उत्तरपुर्व रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी संजय यादव यांनी सांगितले की मालगाडीच्या एखाद्या बोगीत बिघाड झाला की ती दुरूस्तीसाठी यार्डात नेली जाते. तेथे काही वेळा विलंब होतो. त्यातूनच हा विलंब झाला असावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बस्ती गावातील व्यापारी रामचंद्र गुप्ता यांनी आपल्या नावावर नोव्हेंबर 2014 मध्ये ही मालगाडी बुक केली होती. त्यात त्यांनी इंडीयन पोटॅश लि कंपनीकडून डाय अमोनियम फॉस्पेट या खतासाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकलच्या 1316 गोण्या मागवल्या होत्या व त्या या मालगडीतून येणार होत्या. या विषयी गुप्ता यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी स्पष्ट केले की हा विषय कंपनी आणि रेल्वे यांच्यातील आहे. मी या मालासाठी सदर कंपनीला कोणतेही पैसे दिलेले नव्हते. हा माल माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना पैसे देणे लागत होतो. पण हा मालच माझ्याकडे आला नसल्याने मी तो विषय सोडून दिला. ही मालगाडी नेमकी कोठे अडकली आहे याची चौकशी संबंधीत कंपनीने करणे आवश्‍यक होते असे ते म्हणाले.

गोरखपुर येथील आयपीएल चे असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर डी के सक्‍सेना यांनी सांगितले की नोव्हेंबर 2014 ला हीं मालगाडी बुक करण्यात आली होती हे खरे आहे पण त्यातील बोगी हरवल्यामुळे हा विलंब झाला आहे. दरम्यान सदर कंपनीने रेल्वेच्या विरोधात दावा दाखल केला असून मालाच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. सध्या मालाची स्थिती पाहून नुकसान भरपाईचा विषय मार्गी लावला जाईल असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)