‘मार्च एन्ड’च्या नावाखाली बांधकाम मजूर नोंदणी मातीमोल!

दुसऱ्या नोंदणीलाही हरताळ


कल्याणकारी योजनांपासून मजूर वंचित राहणार

पुणे- बांधकाम मजुरांना कामगार कल्याण महामंडळाच्या सुविधांचा देण्यासाठी पुन्हा एकदा विशेष नोंदणी मोहीम राबविण्याचे आदेश राज्यशासनाने दिले होते. त्यासाठी शासनाने महापालिकेस 31 मार्च अखेरची मुदत दिली होती. मात्र क्षेत्रीय कार्यालयांनी “मार्च एन्ड’चे कारण देत ही मोहीमच राबविली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हजारो मजूर योजनांपासून वंचित राहणार आहेत.

पुणे विभागास किमान 65 हजार कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट असून शहरातील जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करून त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिका हद्दीतील बांधकाम कामगार नोंदणीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नोंदणी प्रमाणपत्रासह कामगारांना बॅंक खाते उघडण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल.
यापूर्वी फक्‍त 1500 मजूरांचीच नोंदणी पालिकेने केल्याने राज्यशासनाने पुन्हा महापालिकेस पत्र पाठवित मार्च अखेरपर्यंत ही धडक मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार, पालिकेच्या कामगार सल्लागार विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना हे नवीन आदेश कळविले तसेच बांधकाम विभागाच्या उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यावर ही जबाबदारी सोपविली. मात्र, “मार्च एन्ड’मुळे आधी ठेकेदारांची बिले मिळवून देण्यासाठी गडबड असलेल्या या उप आणि कनिष्ठ अभियंत्यानी एकाही कामगाराची नव्याने नोंद केलेली नाही. याबाबत कामगार सल्लागार विभागाकडे विचारणा केली असता; शासनाने आदेश दिले असले, तरी क्षेत्रीय कार्यालयांनी मार्च अखेरचे कारण सांगत ही मोहीमच राबविलेली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बांधकाम मजुरांबाबत महापालिकेची असलेली उदासीनता या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.

नोंदणी कशासाठी?
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची राज्यशासनाने स्थापना केली आहे. त्यानुसार 365 पैकी 90 दिवसांपेक्षा अधिक दिवस बांधकाम मजूर म्हणून काम केलेल्या कामगारांना आरोग्य, विमा, जीवन विमा, वैद्यकीय सुविधा, त्यांच्या मुलासाठी शिक्षणाची सुविधा अशा सुविधाचा लाभ दिला जातो. त्यासाठी शासनाने या पूर्वी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 17 या कालावधीत ही नोंदणी मोहीम राबविण्याचे आदेश पालिकेस दिले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)