मायणी पोलिसांची वाळू तस्करांवर कारवाई

सेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा; जेसीबी, ट्रॅक्‍टर ताब्यात

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी)

अंबवडे (ता. खटाव) येथे सुरू असलेल्या वाळूच्या अवैध उपशावर मायणी पोलिसांनी छापा टाकून साडे सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त करून तिघांच्याविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून संदीप कृष्णात गोडसे, समीर श्रीकांत गोडसे, युवराज माधवराव पाटील (तिघे रा. वडूज) यांच्यावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, अंबवडे (ता. खटाव) येथील बुधे वस्ती नावाच्या शिवारात काही लोक जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेर यांना मिळाली होती.

त्यानुसार वडनेर यांनी मायणी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांना कारवाई करण्याची सुचना करून स्वत: वडनेर अंबवडे येथे गेले. गोसावी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, वडनेर यांच्यासोबत आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत बुधे वस्ती येथे सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी पोलिसांना पाहून युवराज महादेव पाटील पळून गेला तर बाकी संशयितांना पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी दोन जेसीबी मशीन, दोन ट्रॅक्‍टर असा साडे सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल काळे, कोळी, नवनाथ शिरकुळे, माळी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)