#मायक्रो-स्क्रीन्स: व्हाईट शर्ट

प्राजक्ता कुंभार 
निर्जीव वस्तूंमध्ये जीव अडकतो आपला! त्यांचे स्पर्श, वास, त्यांचं आपल्याभोवती असणारं अस्तित्व अगदी नकळतपणे सवयीचं होऊन जातं आपल्या! आपल्याही नकळत आपण वस्तूंचं वापरणं आपलंसं करतो, त्यांचे संदर्भ माणसांसोबत जोडतो. आपण लळा लावतो या वस्तूंना. या निर्जीव वस्तूंसमवेत आपली झालेली मानसिक गुंतवणूक, त्यांच्यासमवेत जोडल्या गेलेल्या आठवणी, यांचा हिशेब आपल्या डोक्‍यात अगदी पक्‍का असतो. पण या निर्जीव हिशेबाचा त्रास होतं असेल तर? या निर्जीव आठवणी जपताना आपण स्वतःवरच अन्याय करत असू तर?
“व्हाईट शर्ट’ ही दिग्दर्शक सुमित अरोराची 18 मिनिटांची गोष्ट आहे याच निर्जीव गुंतवणुकीवर बोलणारी! ही गोष्ट आहे वाणी (क्रितिका कामरा) आणि अविक (कुणाल कपूर) या “लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याची. त्या दोघांच्या एका जगावेगळ्या नात्याची.
अविकचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू आहे याची जाणीव वाणीला होते. ती या गोष्टीशी जुळवून घ्यायचा आणि अविकला माफ करायचा प्रयत्न करते खरा, पण पुनःपुन्हा तीच चूक करणाऱ्या अविकला माफ करणं तिलाही शक्‍य होतं नाही. या अफेअरमुळे दोघांचं ब्रेकअप होतं. वाणी अविकला घर सोडून जायला सुचवते. तो घर सोडून जातो खरा; पण स्वतःचा एक पांढरा शर्ट मुद्दाम कपाटात विसरून जातो. त्यानिमित्ताने का असेना पण वाणी त्याला विसरणार याची तजवीज करून तो जातो. कधीतरी कपडे आवरताना तिला तो शर्ट सापडतो आणि त्या शर्टच्या रूपाने अविकची नको असलेली आठवण पुन्हा येते तिच्या आयुष्यात. तो शर्ट परत देण्यासाठी तिची धडपड सुरू होते. त्यातून मग पुन्हा अविकचे कॉल्स रिसिव्ह करणं, दिवसभर त्याचा आणि त्या “व्हाईट शर्ट’चा विचार करत राहणं सुरू होतं.
ऑफिसमधून घरी गेल्यावर ती तोच शर्ट घालायला सुरुवात करते. जेवताना, झोपताना, घरातली छोटी मोठी कामं करतानाही वाणीला तोच पांढरा शर्ट हवा असतो. अविकचं नसलेलं अस्तित्व त्या शर्टमधून ती पुन्हा जगायचा प्रयत्न करते. अविकही शक्‍य ते वेगवेगळे प्रयत्न करून, तो शर्ट परत घ्यायचं टाळतो. ‘तू मला विसरू शकत नाहीस,’ या गोष्टीची जाणीव वाणीला व्हावी, अशीच इच्छा असते त्याची! त्या शर्टचा स्पर्श, त्याचा वास सगळं पुन्हा फिरून फिरून वाणीला आपल्याकडे आणून सोडेल असं वाटत असतं त्याला. पुढे त्या “व्हाईट शर्ट’ने आपल्याला पुरतं झपाटून टाकलंय याची वाणीला जाणीव होते आणि एका अनपेक्षित शेवटासह ही गोष्ट संपते.
प्रेम, “लिव्ह-इन’मध्ये राहणं, रिलेशनमध्ये असतानाही एका पार्टनरच बाहेर सुरू होणारं अफेअर आणि त्यातून होणारा ब्रेकअप, या सध्याच्या अतिशय कॉमन टप्प्यांवरची अगदी आपल्यातलीच वाटावी, अशी ही गोष्ट एका “व्हाईट शर्ट’मुळे अनकॉमन ठरते. क्रितिकाचा अभिनय उत्तम. नात्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारी, विश्‍वासघातामुळे दुखावलेली; तरीही प्रयत्नपूर्वक अविकला आयुष्यातून बाहेर काढणारी गर्लफ्रेंड तिने उत्तम निभावली आहे. कुठेही आदळ-आपट नाही की, रडारड नाही.
एकाच बेडवर झोपलेले असताना तिचं अतिशय थंडपणे अविकला घर सोडून जायला सांगणं, अंगावर काटा आणतं. कुणाल कपूरचा ‘टिपिकल इंडियन’, पुरुषी अहंकार असणारा, ‘मला सोडून कुठे जाणार आहे ही?’ असा ऍटिट्युड असणारा बॉयफ्रेंड पण या गोष्टीला अधिक अर्थवाही करतो. एकूण काय, तर नातं तुटल्यावर किंवा माणूस सोडून गेल्यावर त्याच्या आठवणी निर्जीव वस्तूंमधून जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाने एकदा आवर्जून पाहावी, ही ‘व्हाईट शर्ट’ची गोष्ट.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)