मायक्रो-स्क्रीन्स: ‘छुरी’ 

प्राजक्ता कुंभार
भारतीय परंपरेमध्ये कुटुंब व्यवस्था हा आजही एक महत्त्वाचा संस्कारक्षम, बलवान आणि समाजाला एकत्र बांधून ठेवणारा घटक आहे, हे मान्यच करायला हवं. नातेसंबंध, एकमेकांवरील विश्‍वास आणि या विश्‍वासाला खतपाणी घालणारं प्रत्येकाचं वर्तन यामुळे ही कुटुंब व्यवस्थेची चौकट टिकून आहे. मात्र, काही वेळा असं होतं की, या चौकटीलाही तडे जातात, कोणी तरी आपल्या नीतिमत्तेने वागण्याच्या मर्यादा ओलांडतं आणि एकमेकांवरील विश्‍वासाचा कडेलोट होत असतानाच, नात्याचे वेगळेच रंग आपोआप उमलू लागतात आणि असं जर मर्यादाउल्लंघन पती-पत्नीच्या नात्यात विशेषत: घडताना दिसलं, तर मग मात्र आयुष्याचं एक वेगळंच, पण नको असलेलं दान वाट्याला येत रहातं. तो किंवा ती आपला जीवनसाथी सोडून, अन्य कुणात गुंतत जातो/जाते आणि मग रेशमी नात्यांचा एक जीवघेणा खेळ सुरू होतो, व्यभिचाराचा! होय, विवाहबाह्य संबंधाचा!!!
व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंडसंहितेचं कलम 497 हे सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवलं असलं, तरी नवरा-बायकोच्या नात्यात येणारी ‘ती’ हा नेहमीच एक क्रिस्पी टॉपिक असतो. सुखाने चालू असणाऱ्या दोघांच्या संसारात, कानामागून येऊन तिखट होणारी ती नेहमीच लेखक दिग्दर्शकांना भुरळ पाडते. मानसी जैन या दिग्दर्शिकेची ‘छुरी’ ही 12 मिनिटांची गोष्ट याचं ‘तिच्या’ खटकणाऱ्या अस्तित्वावर भाष्य करणारी आहे. टिस्का चोप्रा, अनुराग कश्‍यप आणि सुरवीन चावला या त्रांगडाच्या अफलातून अभिनयाने या गोष्टीत जान टाकलीय. आपला नवरा आपल्याला फसवतोय, आता त्याच्या आयुष्यात आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी महत्त्वाचं आहे हे लक्षात आल्यावर बायकोची घुसमट होणं साहजिक आहे. मात्र, या घुसमटीला आदळआपट, रडारड याची जोड न देता, या समस्येचं निराकरण एखाद्या अफलातून युक्तीनं कसं करता येईल, हे मजेशीरपणे उलगडवून दाखवणारी ही एक हलकी फुलकी शॉर्टफिल्म आहे.
सरळ साधं चौकोनी कुटुंब. नवरा, बायको आणि दोन मुलं. रविवारचा निवांत दिवस. बायकोची धावपळ सुरू. मुलांचा नाश्‍ता, घराची आवराआवर.
पण या सगळ्या धावपळीतही आपल्या नवऱ्याचं घरात लक्ष नाही हे तिच्या नजरेतून सुटलं नाही. त्याचं मोबाइलमध्ये गुंतलेलं असणं, नोटीफिकेशन पाहून हसणं हे तिच्याच नाही तर तिच्या मुलीच्याही लक्षात आलंय. रविवार असूनही कोणत्यातरी तद्दन सुमार कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या त्याला ती अडवायचाही प्रयत्न करते. मुलगी क्‍लाससाठी सोडण्याच्या त्याने केलेल्या प्रॉमिसची आठवण करून देते. पण ‘तिच्या’साठी पुरता वेडावलेला तो या कशालाही न जुमानता घराबाहेर पडतो. बाबाच्या बाहेर सुरू असणाऱ्या या प्रकारावर, आपली आई इतकी थंड कशी राहू शकते, या विचाराने वैतागलेली तिची लेक, ‘आप कुछ नहीं कर सकते’ असं ऐकवून मोकळी होते. मात्र ‘शांतीत क्रांती’ करणारी आपली टिस्का चोप्रा सरळ पोहोचते ते ‘तिच्या’ फ्लॅटवर. आपला नवरा नक्कीच तिच्यासोबत असणारं हे माहीत असतानाही कोणतीही टिपिकल रडारड न करता, मला काही माहीत नाही अशाच अविर्भावात ती त्या फ्लॅटमध्ये शिरते, आणि सुरवीन चावलाशी एक डील करते. आता या डीलचा नेमकं काय परिणाम होतो, त्याचं फ्लॅटमध्ये लपून बसलेला तिचा नवरा हे ऐकतो का, त्या दोघींच्या बोलण्यातून नेमकं कोणतं गुपित बाहेर पडतं, हे सगळं जाणून घेण्यासाठी ही शॉर्ट फिल्म बघणं इज मस्ट.
बंधनाच्या पलीकडे जाऊन आपल्या माणसाला परत आपल्याकडे वळवणंही कला आहे आणि नेमकी तीच गोष्ट ही शॉर्टफिल्म आपल्याला सांगते. कोणतीही रडारड नाही, शपथांची देवाण-घेवाण नाही, ‘तुझ्याशिवाय मी कशी जगू’ असा दुबळेपणा नाही. नवरा भरकटतोय, आपल्या दोघांमध्ये येणाऱ्या तिचं वागणं चुकतंय, हे सगळं कळतं असूनही एका काठावर खंबीरतेनं पाऊल रोवून उभं राहण्याची हिम्मत आहे फक्त ही. व्याभिचार आणि अनैतिकता यांची समीकरणं उलगडवून दाखवणारी ही गोष्ट प्रत्येकाने एकदा पाहावी, हे मात्र नक्की.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)