मान्सूनच्या सरींनी बळीराजा सुखावला

मंचर – पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अडीच तास ढगफुटीसदृश पाऊस होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रचंड पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

पिंपळगाव खडकी येथे दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत लिंबाचा मळा, पिराचा मळा, गव्हाळी मळा, गावठाण परिसरात ढगफुटीसारखा पाऊस होऊन शेती पिकांसह रस्ते वाहून गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप तर ओढ्यांना पुराचे स्वरूप आले. अनेक घरांनी पाणी घुसल्याने धान्य, खतांचे तसेच इतर वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः शेतीचे बांध आणि माती या पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेले आहे. तब्बल अडीच तास धो-धो पावसाने हाहाकार माजविला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महसूल खात्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या युवासेनेचे राज्य समन्वयक संचिन बांगर यांनी केली आहे.

दुष्काळात होरपळलेल्या पिकांना जीवदान
पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील मंचर, पिंपळगाव (खडकी), निरगुडसर, जारकरवाडी, लोणी, धामणी, पारगाव, भराडी आदी परिसरात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे पाण्याअभावी जळून लागलेल्या ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे. पूर्व भागातील अनेक गावांना या मुसळधार पावसामुळे झोडपले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसामुळे शेतातील जनावरांच्या हिरवे गवत तसेच ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे.

पेठमध्ये वेळ नदीला पूर
परिसरात आज (गुरुवारी) दुपारी पावणेचारच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा आनंदी झाला आहे. दुपारी मोठ्या प्रमाणावर आकाशात ढग जमले. वादळ, वारा सुरू झाला व जोरदार पाऊस पडला. रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. विजा चमकू लागल्या. शेतातून पाणी पळू लागले. शेतीत ओलसरपणा निर्माण झाल्याने अनेक बटाटा व्यापारी यांनी बटाटा बियाणे गाड्या फोनवरून बुक केल्या. पावसाळी बटाटा पीकाचे आगार म्हणून सातगाव पठार भाग समजला जातो. या भागात कारेगाव, भावडी, कुरवंडी, पेठ, पारगाव, थुगाव येथील शेतकरी आनंदी होऊन शेतात बटाटा पीक म्हणून लागवड करण्यासाठी सज्ज होणार असल्याचे अनेक बटाटा व्यावसायिकांनी सांगितले. अर्धा तास पाऊस फिरून फिरून येत होता. सर्वत्र अंधार झाला होता. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठले होते. तर वाहतूक पूर्ण बंद होती. पुन्हा साडेचारला मुसळधार पाऊस आला. त्या पावसाने कहर केला. शाळेतील मुले शाळेतच अडकली. त्यामुळे पालक चिंतेत पडले. वादळ, विजांचा कडकडाट प्रचंड होत होता. मुलांना घरी न्यायचे कसे, या चिंतेत पालक होते. बेसावध असल्याने अनेकांचे कडबे, गुरांचा सुका चारा आलेल्या मोठ्या पावसाने भिजला होता. सर्वात मोठा पाऊस आज पडल्याने शेतकरी राजा प्रचंड सुखावला आहे. बॅंकांतून कर्ज काढू; पण येथील शेतकरी आपल्या शेतात बटाटा लागवड करण्यात सज्ज होणार, ही भावना आजच्या पावसाने निर्माण झाली.

भोरमध्ये पाणीच पाणी
तालुक्‍यात आज दुपारी तीन वाजेपासून मान्सूनचा पाऊस सुरु झाला असून, चार ते पाच तास जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे बळीराजा सुखावला आहे. गेल्या 15-20 दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज जोरदार हजेरी लावल्याने भात पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर तालुक्‍यात भात खाचरांत भाताचे तरवे हिरवळत असतानाच पावसाने दडी मारली होती. आजच्या सर्वदूर पावसाने भात पिकांचे तरव्यांना जीवदान मिळाले असले तरी, तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील भात रोपांचे तरवे पावसाअभावी सुकून करपले असल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे बियाणे वाया गेले आहे. यामुळै बळीराजावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. आज सुरू झालेला मान्सूनचा पाऊस आठ-दहा दिवसांपूर्वी सुरु झाला असता, तर हे संकट ओढवले नसते, असे मावळी दुर्गम डोंगरी भागातील शेतकरी बोलत आहेत. भात रोपे करपल्याने आता पुन्हा भाताचे बियाणे कसे उपलब्ध होणार? या चिंतेने शेतकरी बांधव ग्रासले आहेत. भोर तालुक्‍यात इंद्रायणी आणि फुले प्रगती या सुवासिक भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कृषि विभागाच्या माळेवाडी येथील बीज केंद्रावरही आता बियाणे शिल्लक नसून बियाणे पुरवठा करणाऱ्या दुकानदारांचे यामुळे चांगलेच उखळ पांढरे होणार असल्याचे बोलले जात आहे.

भोर हा अतिवृष्ठीचा तालुका असून तालुक्‍यात सुमारे साडेसात हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भाताचे पिक घेतले जाते. पश्‍चिम पट्ट्यातील आंबवडे, हिर्डोशी, भुतोंडे, पसुरे- वेळवंड खोऱ्यात सुमारे तीन ते साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. हिर्डोशी खोऱ्यातील शिरगांवला तर भोर तालुक्‍यातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. तेथे साडेतीन ते चार हजार मिलीमीटर एवढा पाऊस होतो. तालुक्‍यात नीरादेवघर आणि भाटघर धरणे असून यावर्षी पावसाचे आगमन लांबल्याने धरणांच्या पाण्याने तळ गाठला आहे. मात्र आता सुरु झालेल्या मान्सूनच्या पावसाने थोड्याच दिवसांत पाणी पातळीत वाढ होईल, अशी आशा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.