मानाच्या गणपतींचे विसर्जन पात्राबाहेरच

पुणे – खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग कायम आहे. तसेच पुढील दोन दिवस धरणक्षेत्रांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा मानाच्या पाचही गणपतींसाठी मुठा नदीत तात्पुरते उभारले जाणारे विसर्जन हौद यंदा पात्राबाहेर सुरक्षित स्थळी उभे केले जाणार आहेत, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले आहे.

टिळक यांनी मंगळवारी प्रमुख विसर्जन घाटांची पाहणी करत कामाचा आढावा घेतला. यावेळी या मानाच्या गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनानिमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या बदलास संमती दिल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कसबा गणपती, तांबडी जोगेश्‍वरी, गुरूजी तालीम, तुळशी बाग, केसरीवाडा तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासह, भाऊ रंगारी मंडळ त्यांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन हौदात करतात.

त्यासाठी पांचाळेश्‍वर आणि पतंगा विसर्जन घाट परिसरात नदीपात्राच्या आतील बाजूस स्वतंत्र स्टेज तसेच मांडव घालून हे हौद तयार केले जातात. यंदा ही व्यवस्था झालेली नाही. यावर्षी संपूर्ण गणेशोत्सवात मुठा नदीत विसर्ग सुरू आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेने या मानाच्या गणपती मंडळांशी चर्चा करून हे विसर्ज हौद नदीपात्राच्या बाहेर नदीच्या पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी तयार करण्यास मान्यता दिली आहे.

दरम्यान, या पाहणीवेळी उपायुक्त नितीन उदास, सहायक आयुक्त किशोरी शिंदे तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

मानाचे गणपती विसर्जित केल्या जाणाऱ्या दोन्ही घाटांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वर्षी पहिल्यांदाच हे घाट नदीपात्राबाहेर असल्याने या भागात वर्दळ असणार आहे. त्यामुळे ही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– मुक्ता टिळक, महापौर.

Leave A Reply

Your email address will not be published.